आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फायलिन’ महावादळाचे सावट : निम्म्या भारताएवढा अजस्त्र आकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर/हैदराबाद/नवी दिल्ली - ‘फायलिन’ हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ वेगाने भारतीय किनारपट्टीकडे झेपावत आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास हे विक्राळ वादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. या वेळी ताशी तब्बल 220 ते 260 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. फायलिनचे आकारमान अर्ध्या भारताच्या क्षेत्रफळाइतके अजस्र आहे. सरकारने लष्कराच्या तिन्ही दलांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.


1.2 कोटी लोकांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, प.बंगाल व बिहारमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. ओडिशा व आंध्रात सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. किनारपट्टी भागांतून दीड लाखापेक्षा अधिक लोकांना हलवण्यात आले आहे. वादळामुळे समुद्रात 9 ते 20 फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात. असे झाल्यास ओडिशा व आंध्रातील नद्यांना महापूर येईल. शुक्रवारी मध्यरात्री फायलिन ओडिशा किना-याहून 400 किलोमीटर अंतरावर होते. ताशी 15-20 किमी वेगाने ते किना-याकडे झेपावत होते. दुसरीकडे, ओडिशा व आंध्रात वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.


धोका किती गंभीर?
ओडिशात 1999 मध्ये फायलिनसारख्या वादळात 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील कॅटरिना वादळापेक्षा फायलिन अधिक धोकादायक आहे. कॅटरिनामध्ये 1800 जणांचा बळी गेला, तर 21 लाखांपेक्षा अधिक जण बेघर झाले होते. यात 4.58 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.


समुद्रात जितका वेळ राहील तितका धोका
हवामान खात्यानुसार जेवढा वेळ हे वादळ समुद्रात राहील तितके ते धोकायदाक होत जाईल. गुरुवारी या वादळाची गती ताशी अवघी 85 ते 100 किमी होती. शुक्रवारी ती 185 ते 200 किमी झाली. शनिवारी ही गती किमान 200 ते 260 किमी राहील.


कुठे, किती परिणाम?
ओडिशातील 23 व आंध्रातील 18 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. ओडिशातील गंजम, खुर्द, पुरी व जगतसिंहपूर व आंध्रच्या श्रीकाकुलम जिल्ह्यांत नुकसान होईल. झारखंड, छत्तीसगड व पूर्व उत्तर प्रदेशालाही फटका बसण्याचा धोका आहे.


राज्यात मध्यम पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात पूर्वेला तीव्र गतीने घोंगावणा-या चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

असून राज्यात ढगाळ वातावरण राहील. ओडिशाच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


तिन्ही सेनादल सतर्क
तिन्ही सेनादलांना सतर्क राहण्याचे निर्देश संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी दिले आहेत. लष्कराचे ‘कमांड अँड कंट्रोल’ युनिट भुवनेश्वरमध्ये दाखल झाले आहे. 20 विमाने व हेलिकॉप्टरही सज्ज आहेत. नौदलाची 30 जहाजे, लष्कराची सी-130 जे, दोन एएन-32 विमाने आणि 18 हेलिकॉप्टर सज्ज आहेत.


बचावाचे प्रयत्न
० ओडिशा-आंध्रात मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई.
० दोन्ही राज्यांत सरकारी कर्मचा-यांची दुर्गापूजेची सुटी रद्द.
० ओडिशात भोजनाची एक लाख पाकिटे.
० सचिवालयात 24 तास काम करणारा नियंत्रण कक्ष तयार.
० ओडिशात 600 पेक्षा जास्त सायक्लोन सेंटर्सची उभारणी.

- एनडीआरएफच्या 28 टीम ओडिशात, 15 टीम आंध्रात दाखल
- पाराद्वीप पोर्ट शुक्रवारपासूनच बंद करण्यात आले.