आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी: रमेशजींचे भाषांवर प्रेम असल्यानेच पाच भाषांतून काढली वृत्तपत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकारिता व उद्योजक म्हणून अद्वितीय व्यक्तिमत्त्व. त्यांचे व्यावहारिक कौशल्य अफलातून होते. अगदी लाल कार्पेटवरील असामीदेखील त्यांचे चाहते होते. सामान्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी ते उपलब्ध असत. गेली चार दशके त्यांच्या सहवासात राहिलेले अलीम बजमी यांनी त्यांच्याबद्दलचे अनुभव मांडले.

रमेशचंद्र अग्रवाल.भास्कर वृत्तपत्र समूहाचे चेअरमन. पत्रकारिता व उद्योग क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व. सर्वांसाठी ते ‘भाई साहब’ म्हणून परिचित. सफारी सूटमध्ये ते नेहमी वावरत. त्यांची वागणूक अफलातून होती. लाल कार्पेटवरील असामीदेखील त्यांचे चाहते होते. सामान्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना रमेशजी उपलब्ध असत. मात्र बुधवारी रमेशजी आपल्या सर्वांना सोडून गेले,यावर विश्वास बसत नाही. १२ एप्रिलला त्यांनी नश्वर जगाला अलविदा केला.

आता मागे वळून पाहिल्यास एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. मोठे शेठ द्वारकाप्रसाद अग्रवाल यांनी भोपाळहून १९५४-५५ मध्ये ‘प्रकाश’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ही गोष्ट बहुदा फार कमी लोकांना ठाऊक असावी. हे वृत्तपत्र तीन वर्षे प्रकाशित झाले. त्यानंतर कोतवाली मार्गावर दैनिक भास्करची सुरुवात १३ ऑगस्ट १९५८ रोजी झाली होती. वृत्तपत्रातील प्रत्येक शब्द मनात उतरणारा होता. त्यासाठी कधी शब्दसंग्रह पाहण्याची वेळ आली नव्हती. या गोष्टी बडे शेठजी अतिशय चांगल्या पद्धतीने जाणत होते. त्यामुळेच बातम्यांमध्येही संभाषणातील प्रचलित हिंदीला अधिक महत्त्व दिले गेले. 

भोपाळच्या बाहेर रमेशचंद्रजी यांच्या वृत्तपत्रासाठी पहिली जाहिरात धीरुभाई अंबानी यांनी १९७८ मध्ये दिली होती ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल. तेव्हा ती जाहिरात पाच हजार रुपयांची होती. शेठ द्वारकाप्रसाद अग्रवालजींचा अनुभव, रमेशजींचा दृष्टिकोन यामुळे झाशी व ग्वाल्हेरमधून दैनिक भास्कर प्रकाशित होऊ लागला. त्यातूनच जणू महाकालाचे आशीर्वाद मिळाले व उज्जैनमधूनही भास्कर प्रकाशित होऊ लागला. वृत्तपत्र व्यवसायाच्या या प्रवासात रमेशचंद्रजी यांना आधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात आले होते. रमेशचंद्रजींनी बडे शेठना ऑफसेटची कल्पना दिली. त्यांनी तिला तत्काळ मंजुरी दिली. त्यानंतर तंत्रज्ञान वापराची सुरुवात भोपाळमधून झाली. 

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरेंद्रकुमार सकलेचा यांनी १९७८ मध्ये त्याचा शुभारंभ केला. ऑफसेट प्रिंटिंगद्वारे काळ्या रंगांतील अक्षरे पांढऱ्या कागदावर अतिशय ठळकपणे उमटू लागली होती. भास्कर अधिक देखणा झाला हाेता. १९८० मध्ये भोपाळ भास्करमध्ये संगणकीय अक्षरजुळणीची सुरुवात झाली आणि वृत्तपत्राचे रुपडेच पालटून गेले. मला चांगले आठवते. तेव्हाचे खासदार कमलनाथ १९८२ मध्ये कोतवाली मार्गावरील भास्करच्या कार्यालयात रमेशचंद्रजींना भेटायला आले होते. 

ऐंशीच्या दशकात संगणक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाहून तेदेखील थक्क झाले होते. कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. यानंतर १९८३ मध्ये रमेशजींच्या नेतृत्वामध्ये इंदूरहून भास्कर छापला जाऊ लागला. इंदूरमध्ये मिळालेल्या एेतिहासिक यशानंतर भास्करने वळून पाहिलेच नाही. भास्कर प्रारंभापासूनच गंगा-जमनी तहजीबचा पाठीराखा राहिला. १९९२ मध्ये जेव्हा भोपाळचे वातावरण बिघडले तेव्हा भास्करच्या वृत्तांकनाची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही स्तुती केली. भास्कर अल्लामा इक्बाल यांच्या त्या शिकवणीचा खंदा पुरस्कर्ता आहे. भास्करने अनेक मैफलींद्वारे लोकांना जीवनाच्या सुफियानी आणि रुमानी रंगाशी परिचित करून दिले. 

सामाजिक जबाबदारी म्हणून भास्करने पाणी वाचवा मोहीम देशभरात चालवली. याची दखल घेऊन अनेक राज्यांत सरकारने जलफेरभरण स्वीकारले, यामुळेच आज थेंब न थेंब पाणी वाचवण्याचे कार्य होत आहे. पर्यावरणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम, उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मातीचे भांडे  वाटण्यापासून अन्नदान, वस्त्रदान आदींची मोहीमही चालवली. भास्कर आता दैनिकासह आमचा साथीदारही झाला आहे. रमेशजींनी या लौकिक जगाला अलविदा केले असले तरी ते अजूनही आपल्यातच आहेत, अनुभूतीत आणि अाठवणीत. त्यांची कीर्ती दिगंत राहील. 

उर्दूतील दैनिक आफताब-ए-जदीददेखील काढले...
रमेशजी यांना हिंदी भाषेप्रमाणेच उर्दू भाषेबद्दलही खूप प्रेम होते. यामुळेच त्यांनी १९७७ मध्ये आफताब-ए- जदीद नावाचे एक उर्दू दैनिक काढले. या दैनिकाद्वारे त्यांनी उर्दूची सेवा केली. जवळपास २० वर्षे छापल्यानंतर हे दैनिक काही कारणाने बंद झाले. यानंतर इंग्रजीत भास्करचे प्रकाशन एमपीनगरहून झाले. नंतर याचे नाव नॅशनल मेल केले गेले. पण काही वर्षांनंतर याचे प्रकाशन बंद झाले.
 
-  लेखक भास्कर भोपाळमध्ये वृत्तसंपादक आहेत. 
बातम्या आणखी आहेत...