हैदराबाद/दिल्ली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) नेता सुशीलकुमारच्या तक्रारीवरुन दलित स्कॉलर्स रोहित वेमुलासह पाच विद्यार्थ्यांना हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातून काढून टाकण्यात आले होते. मात्र आता अशी माहिती पुढे येत आहे, की सुशील हा रोहित आणि त्याच्या विद्यार्थी सहकाऱ्यांच्या मारहाणीमुळे जखमी झाला नव्हता. तर, त्याला आधीपासूनच श्वसनाचा आणि अॅपेंडिक्सचा आजार होता.
मेडिकल रिपोर्टमध्ये काय होते
- पीएच.डी करणारा रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांवर सुशीलवर कथित हल्ला केल्याचा आरोप होता. सुशीलला मदीनागुडा येथील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
- सुशीलला त्याचा भाऊ विष्णु हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. मेडिकल ऑफिसर अनुपमा राव आणि विद्यापीठाचे अधिकारी आर.पी.शर्मा त्याला पाहायला हॉस्पिटलला गेले होते. ही घटना 4 ऑगस्ट 2015 ची आहे.
- एका इंग्रजी दैनिकासोबत बोलताना डॉ. अनुपमा राव यांनी सांगितले, सुशीलच्या खांद्यावर हलके ओरखडे होते, त्याला मारहाण झाल्याचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. त्याच्या शरीरावर कुठेही जखमा किंवा मारहाणीची व्रण नव्हते.
- डॉ. राव यांनी सांगितले, की वैद्यकीय तपासणीत आढळून आले की त्याला आधीपासून एपेंडिसायटिस आणि श्वसनाचा आजार होता.
सुरक्षा अधिकारी काय म्हणाले
- विद्यापीठ वसतिगृहाचे सुरक्षा अधिकारी दिलीपसिंह यांनी सांगितले, रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत सुशीलकुमारचा वाद झाला होता, मात्र त्यांच्यात मारहाण झाली नव्हती.
- सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सुशीलला जेव्हा सुरक्षा रक्षक जीपमध्ये घेऊन गेले तेव्हा रोहितच्या मित्रांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढीच त्यांच्यात बाचाबीची झाली. त्यात त्याचा शर्ट फाटला आणि खांद्याला ओरखडले गेले. मात्र, रोहित आणि सुशीलकुमार यांच्यात मारहाण झाली नव्हती.
राजकारण तापले
दलित स्कॉलर्सच्या आत्महत्येवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी हैदराबादला जाऊन रोहितच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या विद्यार्थी मित्रांची भेट घेतली. काँग्रेसने या मुद्यावर भाजपला घेरले आहे. केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात हा मुद्दा गाजणार आहे. काँग्रेसने त्यांच्या दलित नेत्यांना भाजपविरोधात पुढे केले आहे. कुमारी शैलजा यांनी रोहितच्या हत्येसाठी केद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांना जबाबदार ठरविले आहे. त्या म्हणाल्या, रोहित आणि त्याच्या चार विद्यार्थी सहकार्यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. मात्र विद्यापीठ प्रोक्टोरियल बोर्डाने चौकशीअंती त्यांचे निलंबन रद्द केले होते.
त्यानंतर एबीव्हीपी नेते आणि बंडारू दत्तात्रेय यांनी विद्यार्थ्यांच्या निलंबनासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयावर दबाव आणला, त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली. या अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना 18 डिसेंबर रोजी पत्र लिहून व्यथा मांडली होती. परंतू राजकीय दबावामुळे त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही आणि रोहितला आत्महत्येस भाग पाडले.
एचआरडी मंत्रालयाच्या पत्रामुळे दबाव : विरोधक
मंत्री दत्तात्रेय यांनी १७ ऑगस्ट २०१५ रोजी स्मृती इराणी यांना पत्र लिहिले होते. त्यांनी विद्यार्थी संघटनेवर देशविरोधी कृत्य अभाविप नेत्याला मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्याच्या उत्तरात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सप्टेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत पाच पत्रे लिहिली. ही पत्रे रोहित आणि इतर दलित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने दबाव आणण्यासाठी लिहिली होती, असा राजकीय पक्ष, नेत्यांचा आरोप आहे.
केजरीवाल, तृणमूलचे खासदारही हैदराबादेत
विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही आत्महत्या नाही तर लोकशाही, सामाजिक न्यायाची हत्या आहे. मोदींनी मंत्र्यांना हाकलावे देशाची माफी मागावी. तृणमूलचे खासदारही हैदराबादेत पोहोचले. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कुलगुरूंच्या अटकेची मागणी केली आहे.
अशोक वाजपेयी डि. लीट परत करणार
रोहित वेमुला याला दलितविरोध आणि मतभेद याबाबतच्या असहिष्णुतेमुळे आत्महत्या करणे भाग पडले. त्याला लेखक व्हायचे होते. मी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ पदवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिकारी बहुधा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. विद्यापीठाने मानवी सन्मानाच्या विरोधात काम केले.
- अशोक वाजपेयी, प्रसिद्ध लेखक
पुढील स्लाइडमध्ये, केंद्रीय मंत्र्यावर कारवाई का