फरिदाबाद - दलित कुटुंबाच्या घरात आग लावल्याच्या घटनेच्या विरोधात सुनपेड गावातील नागरिकांनी बुधवारी आंदोलन केले. या घटनेत चिमुरडी मुले गमावलेल्या जितेंद्र यांनी मुलांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. घटनेचा विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी बल्लभगड-फरिदाबाद रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. हरियाणी सरकार या घटनेच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
फरिदाबादमधील एका दलित कुटुंबाच्या घरात पेट्रोल टाकून आग लावलण्यात आल्यानंतर राजकीय नेत्यांची सोनपेठ गावात रिघ लागली आहे. बुधवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील आज येण्याची शक्यता आहे. तर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा दौरा तणावामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.
राहुल गांधी दोन मुले गमावलेल्या जितेंद्रची भेट घेतल्यानंतर मीडियासमोर आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले, तुमचे विरोधक म्हणत आहेत की तुम्ही फोटो-ऑपसाठी आले ? यावर राहुल गांधी संतप्त झाले. ते म्हणाले, 'असे म्हणणारे पीडितांचा अपमान करत आहेत. त्यांनी (पीडित कुटुंबाने) आधीच आपलं बरच काही गमावले आहे. त्यानंतर जर कोणी असे म्हणत असेल, तर ते त्यांच्या भावना दुखावत आहेत.' थोड्या चढ्या आवाजात राहुल म्हणाले, कोण म्हणते की हे फोटो-ऑप आहे? येथे लोकांना जिवंत जाळण्यात आले आहे. लोकांच्या हत्या होत आहेत. यानंतरही लोक असं कसं म्हणू शकतात ?
काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, पीडित कुटुंबाचे प्रशासन ऐकत नाही. ते गरीब आणि असाह्य असल्यामुळे त्यांना दाबण्यात येत आहे. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची प्रशासन दखल घेत नाही. काही दिवसांपूर्वी ते पोलिस प्रशासनाकडे गेले होते, मात्र 'अजून कोणी मेले तर नाही ना', असे सुनावण्यात आले आणि हकलून दिले. अशा घटना केवळ काही हरियाणा आणि काही राज्यात होत नाही तर संपूर्ण देशात हेच घडत आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
ज्या पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने घटनेची सीबीआय चौकशी करावी असेही राहुल म्हणाले. मला शक्य तेवढी सर्व मदत करले असे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधान - आरएसएसवर हल्ला
देशात अशा घटना वाढल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) हल्ला केला. ते म्हणाले, 'पंतप्रधान, आरएसएस आणि भाजपचे हेच धोरण राहिले आहे. यांनी गरीबांना कायम दाबण्याचा प्रयत्न केला आहे. गरीब आहे तिथेच राहावा हिच यांची इच्छा आहे.'
पोलिस आणि आरोपींचे संगनमत - वृंदा करात यांचा आरोप
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीएम) नेत्या वृंदा करात यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्या म्हणाल्या, येथे संरक्षणासाठी तैनात पोलिस जागरणासाठी का गेले होते ? त्यांनी शंका व्यक्त केली, की या घटनेत आरोपी आणि पोलिस यांची मिलीभगत असण्याची शक्यता आहे. वृंदा करात म्हणाल्या, 'मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी जात आहेत, पण त्यांच्या राज्यात एवढी मोठी घटना झाल्यानंतरही त्यांना येथे येण्यास वेळ काढता येत नाही का ?'
कोण काय म्हणाले
>> केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, 'या प्रकरणी मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत बोलणे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.'
>> काँग्रेस प्रवक्ते पी. सी चाको म्हणाले, 'या घटनेनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही.'
>> राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव म्हणाले, 'बिहारमध्ये भाषणबाजी करण्याआधी मोदींनी स्पष्ट केले पाहिजे की देश आणि हरियाणात त्यांच्या राज्यात आणखी किती दलित, पीडितांना जिवंत जाळण्यात येणार आहे ? आत्ममग्नतेचे शिकार पंतप्रधान महोदयांनी मन की बात ऐवजी दलित-मागास-कष्टकरी समाजाच्या कष्टाबद्दल बोलले पाहिजे.'
मुलांवर अंत्यसंस्कार करण्यास नकारबुधवार सकाळपासून गावात तणावाचे वातावरण आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुलांवर अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.