आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्या लोहडी : ३,४०० मुलींना ३२ कोटी रुपयांचे शिक्षण पॅकेज भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर (राजस्थान) - श्रीगंगानगरमधील रामलीला मैदान रविवारी फुलून गेले हाेते. कारणही तसेच होते. मुलींच्या शिक्षणासाठी विशेष पॅकेजची शहरातील हजारो लोकांच्या साक्षीने घोषणा होणार होती. लॉटरी पद्धतीने हे पॅकेज मिळवणाऱ्या मुलींची नावे जाहीर केली जाणार होती. पहिली लॉटरी इंजिनिअरिंगच्या जागेसाठी होती. नाव पुकारले गेले... अमृता. आपले नाव ऐकताच अमृता नामक मुलीस अत्यानंदाने रडू कोसळले. कारण अखेर तिचे इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण होणार होते.

अमृताचे वडील रिक्षाचालक आहेत. चार भाऊ आणि ती, अशी भावंडे. तिला इंजिनिअर व्हायचे होते. मात्र, फीस सोडा, साधा अर्ज भरण्याचीही वडिलांची ऐपत नव्हती. हीच अवस्था शिवानीची. तिचे वडील भंगार सामानाचा व्यवसाय करतात. तिला ब्यूटिशियनचा काेर्स करावयाचा होता. तिला या अभ्यासक्रमाचे नि:शुल्क पॅकेज मिळाले...

वास्तविक हा ‘कन्या लोहडी’चा कार्यक्रम होता. २००७ पासून हा उपक्रम सुरू आहे. मात्र, प्रथमच १३०० मुलींना एका वेळी १३ कोटी रुपयांचे शिक्षण पॅकेज देण्यात आले. १२ जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात २१०० मुलींना १९ कोटी रुपयांचे शिक्षण पॅकेज दिले जाईल. या तीन दिवसांत ३४०० मुलींना ३२ कोटी रुपयांचे असे शिक्षण पॅकेज मिळेल. हे पॅकेज केवळ मुलींसाठीच असते. याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे पॅकेज दिले जात असताना एका रुपयाचाही प्रत्यक्ष व्यवहार होत नाही किंवा कुणी मदत निधी देत नाही. शहर व परिसरातील शिक्षण संस्था, महाविद्यालयांचे प्रतिनिधी येथे येतात आणि या मुलींना भेट म्हणून महाविद्यालयातील जागा भेट देऊन जातात. मग शिक्षण पूर्ण होईपर्यंत संस्था या मुलींकडून एक पैसाही घेत नाहीत. एकदा जागा दिली की शिक्षणाचा खर्चही याच संस्था उचलतात.

अशी होते मुलींची निवड
अगोदर महाविद्यालये व अन्य शिक्षण संस्थांनी विविध अभ्यासक्रमासाठी जागा ठरवल्या. यानंतर गरजू मुलींकडून अर्ज मागवण्यात आले. मग मुलींची इच्छा कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची आहे हे प्रत्यक्ष मुलींशी बोलून जाणून घेण्यात आले. यानंतर झाली अर्जांची छाननी. शेवटी लॉटरी पद्धतीने या मुलींना संबंधित अभ्यासक्रमासाठी सीट देण्यात आले.

शिक्षण पॅकेज असे
नर्सरीपासून अभियांत्रिकीपर्यंतचे मोफत शिक्षण, एमबीए, अभियांत्रिकी, फिजिओथेरपी, पॉलिटेक्निक, एमए, एमएससी, एम. कॉम, बीसीए, बी-फार्मसी, फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन आर्किटेक्चर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, हॅकिंग, अॅनिमेशन, ब्युटिशियन.

पॅकेजची रक्कम ७.७१ कोटींवरून यंदा चाैपट
शिक्षणाचे हे पॅकेज वाढण्यामागचे कारणही मजेशीर आहे. दरवेळी या लोहडीचे आयोजन चेंबर ऑफ कॉमर्स करत होते. गेल्या वेळी कन्या लोहडीमध्ये ७७१ विद्यार्थिनींना ७.७१ कोटी रुपयांचे शिक्षण पॅकेज देण्यात आले होते. या वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे दोन विभाग झाले. एक गंगानगर चेंबर ऑफ कॉमर्स झाला, तर दुसरा मूळ चेंबर ऑफ कॉमर्स. श्रीगंगानगर चेंबर ऑफ काॅमर्सने वर्चस्व राखण्यासाठी ५० संस्थांना सोबत घेऊन २१०० विद्यार्थिनींसाठी १९ कोटींचे पॅकेज देण्याची तयारी केली आहे. हे पॅकेज १२ जानेवारी रोजी दिले जाईल.