चंदिगड, दिल्ली- सिरसा येथील डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याने विशेष न्यायालयाच्या निर्णयास पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तर राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर मानलेली मुलगी व सध्या फरार घोषित असलेल्या हनीप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
हनीप्रीतच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे, तर राम रहीमची याचिका बुधवारी सुनावणीस निघेल. राम रहीम याने सोमवारी दाखल केलेल्या याचिकेत हरियाणाच्या पंचकुला येथील विशेष न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. आता प्रकरण उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागात आहे. याप्रकरणी कोणी आक्षेप न घेतल्यास बुधवारी सुनावणी होईल. सीबीआय न्यायालयाने सर्व तथ्ये लक्षात घेतली नाहीत, तर दिल्ली उच्च न्यायालयात हनीप्रीत तनेजा हिच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये स्वत:च्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.