आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डेरा सच्चा सौदा’ने हरियाणात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला दिला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - हरियाणात सर्वांत मोठी धार्मिक संघटना म्हणून ओळख असलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’ने हरियाणात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही संघटनेने भाजपला पाठिंबा जाहीर केला.

डेरा सच्चा सौदाच्या राजकीय शाखेने ही घोषणा केली. संघटनेचे प्रमुख गुरमित राम रहीमसिंग यांनी याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिरसा येथे जाहीर सभा झाली होती. या वेळी मोदींनी ही संघटना नि:स्वार्थ भावनेतून कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर संघटनेने भाजपला पाठिंबा दिल्याचे मानले जाते.

राजकीय परिणाम काय?
डेरा सच्चा सौदा या संघटनेचे पंजाब व हरियाणामध्ये मोठे काम आहे. या संघटनेने घेतलेल्या उपक्रमांना प्रतिसाद मिळतो. हरियाणात ६० लाख अनुयायी असल्याचा संघटनेचा दावा आहे. हरियाणात भाजप, काँग्रेस आणि इंडियन नॅशनल लोकदलाने शक्ती पणाला लावली आहे.
राम रहीम यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे पारडे जड होऊ शकते. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत या संघटनेने कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिला नव्हता.

भाजप स्वबळावर
इतके दिवस हरियाणात प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करून पाय पसरू पाहणारा भाजप यंदा महाराष्ट्राप्रमाणे हरियाणातही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. यापूर्वी इंडियन नॅशनल लोकदल, हरियाणा विकास पार्टी यांच्याशी निवडणूक युती करून शक्ती वाढवण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र हे पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन झाले आहेत. त्यामुळे डेरा सच्चा सौदाच्या निर्णयाचा भाजपला बराच लाभ होईल, असे मानले जाते.