आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi's Direct Report From Naxalist Camp, Threat, Mindwash Adn Training

नक्षलवाद्यांच्या छावणीतून ‘दिव्य मराठी’चा रिपोर्ट: धमकी, माइंडवॉश अन् प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार-झारखंड सीमेवरील डोंगर आणि जंगलझाडीत लपलेला परिसर म्हणजे लहान मुलांना नक्षलवादाचे प्रशिक्षण देणारे तळ. धमकी देऊन मुलांना येथे आणले जाते. माइंडवॉश करून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशाच एका नक्षल छावणीतून आमचे प्रतिनिधी सत्यप्रकाश यांचा लाइव्ह रिपोर्ट...


नक्षलवाद्यांची राजधानी जमुई. भौगोलिक रचनाच अशी की, सुरक्षा दलाला माहिती मिळाली तरी इथे पोहोचायला सात ते आठ दिवस लागतात. म्हणजेच नक्षलवाद्यांच्या दृष्टीने आदर्श ठिकाण! नक्षलवाद्यांचा कमांडर सिद्धू कोडा सांगतो की, देशभरातील बडे नक्षलवादी येथे येत असतात. जखमी नक्षलवाद्यांवरील उपचारही इथेच होतात.


छावणी पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर आमच्या मोबाइलमधील बॅटरी आणि सिमकार्ड काढण्यात आले. तासभर खडकाळ रस्त्यावरून पायी चालत गेल्यावर डोंगरमाथ्यावर पोहोचलो. चहुबाजूंनी एसएलआर, इंसास आणि एके-47 घेऊन उभे असलेले सुरक्षा रक्षक. डोंगरावरून खाली पाहिल्यास एखाद्या लष्करी छावणीसारखेच दृश्य नजरेस पडते. सगळीकडे वर्दीतील नक्षली. मात्र, त्यात डझनभर लहान मुले.


ओळख करून देण्यात आली- हा आमचा बाल चमू. मुलांना काही विचारायला गेल्यास अडवण्यात आले. कमांडर म्हणाला- सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत. अखेर कमांडरलाच विचारले की, त्या मुलांकडून काय करून घेण्याची तुमची इच्छा आहे. तेव्हा उत्तर मिळाले- ऑपरेशन ग्रीन हंटला प्रत्युत्तर देण्यासाठी ठोस आणि सक्षम तयारी हवी. त्यामुळे या मुलांशिवाय आमच्याकडे इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही.


धमकावून आणतात मुले
माओवाद्यांचा एक समूह गावोगाव जाऊन प्रत्येक घरातून एका मुलाला छावणीत पाठवण्याचे आवाहन करतो. कुणी नकार दिलाच तर त्याला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. कमीत कमी एकाला तरी नोकरी लागली, असे गावकरी मानतात. यामुळे दुहेरी फायदा होतो. नक्षलवाद्यांचा धोका कमी होतो आणि नक्षलवादी बनलेला मुलगा नियमितपणे घरी किराणा पाठवतो.


असे देतात प्रशिक्षण
छोट्या नक्षलवाद्यांना सुरुवातीला काठ्यांनी मारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना वर्दी दिली जाते. टांगी, गडासा, धनुष्य-बाण अशा पारंपरिक शस्त्रास्त्रांत पारंगत केले जाते. पुढे एसएलआर, इंसास, एलएमजी, एके-47, एके 56, केन बॉम्ब तयार करणे, डायनामाइट स्फोटके तयार करणे, इत्यादींसारख्या आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर सराव घेतला जातो.


यासह घात-पात घडवणे, समोरून हल्ला करणे, जंगलात लपण्याची पद्धत, गावात किंवा शहरात जाताच क्षणात सामान्य गावक-याचे रूप घेणे, चकमकीदरम्यान जखमी नक्षलवाद्यांना सोबत घेऊन जाणे किंवा त्यांच्यावर उपचार करणे, एखाद्या परिसराला घेराव घालणे, अधिकाधिक सांकेतिक भाषा वापरणे, प्रत्येक क्षणाची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे, जेपीसीचे ध्येय-धोरण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे आदी प्रशिक्षण दिले जाते.


दूरगामी व गंभीर परिणाम
मानसोपचार तज्ज्ञ गौरव कुमार सांगतात की, लहान मुलांचे मन आणि मेंदू नाजूक असतो. आकार दिला त्याप्रमाणे त्याचा विकास होतो. याचाच फायदा घेत नक्षलवादी मुलांंच्या मनात देशविरोधाचे विष कालवले जात आहे. शिक्षण घेण्याच्या वयात त्यांच्या हाती शस्त्रास्त्र दिले जात आहेत. याचे परिणाम अत्यंत दूरगामी होतील.