आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाविरोधी काम केल्याने करुणानिधी यांनी मुलालाच केले निलंबित, अलगिरी द्रमुकबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे दक्षिण विभागीय सचिव एम. के. अलगिरी यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाविरोधी काम केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अलगिरी करुणानिधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.
द्रमुकच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की अलगिरी आणि त्यांचे समर्थक पक्षाविरोधी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्रमुकचे सरचिटणीस के. अंबाझगन यांनी हे पत्रक काढले आहे.
पक्षातील कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक व्यासपीठ असताना मदुराई येथील पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पोस्टरबाजी व प्रसार माध्यमांना फसव्या मुलाखती देऊन आघाडीची प्रक्रिया विस्कळित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
निलंबनाचे वृत्त समजल्यावर अलगिरी यांचे कनिष्ठ बंधू आणि द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी लगेच एम. करुणानिधी यांची भेट घेतली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री द्रमुकच्या पाच कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावरून अलगिरी संतापले होते. हॉंगकॉंगवरून परतल्यानंतर अलगिरी यांनी करुणानिधी यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. परंतु, त्यानंतर अलगिरी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निलंबित करण्यात आलेले पाचही कार्यकर्ते अलगिरी यांचे समर्थक आहेत.