आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटीसाठी रात्री अधिवेशन; शेतकऱ्यांसाठी वेळ नाही’; राहुल गांधींचे सरकारवर टीकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा (राजस्थान)- लोकसभेत बुधवारी सकाळी आमचे काँग्रेसचे सदस्य शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारशी चर्चा करू इच्छित होते. शेतकऱ्यांच्या दु:खावर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा होती. शेतकऱ्यांचे दु:ख १०-१५ मिनिटांत सभागृहाला ऐकवण्याची आमची इच्छा होती, पण आम्हाला एक मिनिटही बोलू दिले गेले नाही, पंतप्रधानांच्या उपस्थितीत या मुद्द्यावर कोणालाही बोलण्याची इच्छा नव्हती. जीएसटीसाठी रात्री १२ वाजता संसदेचे अधिवेशन घेण्यात आले, पण तेथे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हेच खरे रूप आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी येथे शेतकरी आक्रोश सभेला संबोधित करत होते. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याबद्दल आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील वसुंधरा राजे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आश्वासनावर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टीका केली. २३ मिनिटांच्या भाषणात राहुल यांनी पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा उल्लेख केला. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसच्या दबावामुळेच योगी सरकारने कर्जमाफी केली, असा दावाही त्यांनी केला. या सभेला प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.

अमेरिकेला दाखवण्यासाठी लागू केला जीएसटी 
राहुल म्हणाले की, जीएसटीत काही उणिवा आहेत, त्या दूर करा अन्यथा लोकांची अडचण होईल, असे आम्ही आधीच सांगितले होते. काँग्रेसलाही जीएसटीची अंमलबजावणी करायचीच होती, पण त्यात सर्वांच्या हितांचे रक्षण करायचे होते. फक्त अमेरिकेला दाखवण्यासाठी रात्रीतून जीएसटी लागू करण्यात आला. मोदींनी तुमच्यावर कर लादले आहेत. हे सरकार उद्योगपती आणि कर अधिकाऱ्यांसाठीच आहे.