आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या मागे अभ्यासाची भुणभुण नकोच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - वाढत्या स्पर्धेमुळे मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनाच अभ्यासाचे टेन्शन येत असल्याचे चित्र बहुतांश घरांमधून दिसून येते. मुलांनी जराही वेळ न दवडता फक्त अभ्यासच करावा, असा पालकांचा प्रयत्न असतो. याच कारणामुळे सतत मुलांमागे अभ्यासाची भुणभुण लावतात. हे मुलांच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत कुमारवयीन बालक संगोपन विषयातील समुपदेशक के. एस. चटवाल यांनी व्यक्त केले आहे.


वाढत्या वयाची मुले आणि मोठी माणसे यांच्या विचारसरणीत फरक असतो. मुलांना त्यांचे वय आणि विचारसरणीप्रमाणे स्वप्ने पाहू दिली पाहिजेत. आपल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादता कामा नये, असे चटवाल सांगतात. चंदिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरामध्ये पालकांना मार्गदर्शन करताना चटवाल यांनी मुलांना अपयशाची भीती दाखवू नका असा सल्ला दिला. थ्री इडियट्स चित्रपटातून दिलेला संदेश पालकांनी सदैव ध्यानात ठेवावा. घोकंपट्टी करण्याऐवजी कौशल्य विकसित केल्यास यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. असे केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढेल. स्वत:च्या मर्यादा लक्षात येऊन कौशल्य वाढवण्यासाठी मूल मेहनत घेर्ईल. त्यानंतर अपयश जरी आले, तरी मूल त्याकडे आव्हान म्हणून बघेल, असे चटवाल यांनी सांगितले. त्यासाठी घरात विश्वासाचे वातावरण असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.


पालकांनी असे करावे
मुलांना जबरदस्ती अभ्यासास न बसवता, स्वत:हून अभ्यास करू द्यावा. त्यांची कोणाशी तुलना करू नका. अभ्यासातील छोट्या छोट्या प्रगतीवर शाबासकी द्यावी. कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. रात्रीचे जेवण एकत्र करावे. टीव्ही पाहण्याऐवजी मुलांसोबत चर्चा करावी.


मुलांनी असे करावे
आपले उद्दिष्ट ठरवून घ्यावे. दररोज सकाळी तासभर मोकळ्या हवेत फेरफटका मारावा. दिवसभराचे वेळापत्रक सकाळीच आखून घ्यावे. अभ्यासादरम्यान दर तासाने 10 मिनिटे ब्रेक घ्यावा. रात्री जेवणानंतर अभ्यास झाला की थेट झोपण्यास न जाता, 10-15 मिनिटे शतपावली करावी.