आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाला अर्पण दागिन्यांतही आता भेसळ!,वैष्णोदेवीला वाहिलेले 70 टक्के चांदीचे दागिने अशुद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - भेसळयुक्त वस्तूंच्या जमान्यात साक्षात देवादिकांचीही सुटका झालेली नाही. हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मूतील वैष्णोदेवीच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांत मोठी भेसळ असल्याचे उघड झाले आहे.

गेल्या पाच वर्षांत वैष्णोदेवीला भाविकांनी वाहिलेल्या 193 किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी 22 टक्के सोने भेसळयुक्त आहे. तसेच 8,163 किलो चांदीपैकी तब्बल 70 टक्के चांदी अशुद्ध असल्याची माहिती खुद्द वैष्णोदेवी संस्थानने दिली आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे (एसएमव्हीडीएसबी) मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप भंडारी यांनी आरटीआय कायद्यांतर्गत सादर करण्यात आलेल्या अर्जावर ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, भाविकांनी गेल्या पाच वर्षांत वैष्णोदेवीला अर्पण केलेल्या दागिन्यांची शुद्धता निश्चित करता येत नसल्याचे त्यांची ‘सोनेरी आणि चंदेरी’ धातू अशी ढोबळमानाने वर्गवारी करण्यात आली आहे.

धातूच्या अशुद्ध वस्तूंना सरसकटपणे ‘बनावट’ असे संबोधले जाऊ शकत नाही. भक्त आपल्या इच्छेनुसार देवाला वस्तू अर्पण करत असतात. वैष्णोदेवी मंदिराच्या गुहेत असलेल्या दानपेटीत भेटवस्तू टाकल्या जातात. यामुळे त्यांच्या शुद्धतेची पडताळणी थेट त्याच ठिकाणी केली जाऊ शकत नाही, असेही भंडारी यांनी स्पष्ट केले.
धातूंचे शुद्धीकरण : शुद्धीकरण, धातू पारखणे व पुनर्निर्मिती प्रक्रियेसाठी सोनेरी धातूंचा साठा भारतीय सरकारच्या मुंबईस्थित टाकसाळीकडे पाठवण्यात आला. चंदेरी धातू दिल्लीतील भारतीय सरकारच्या मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पाेरेशनकडे पाठवण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली गेली.


43 किलो सोने, 5,782 किलो चांदी भेसळयुक्त
या प्रक्रियेनंतर 193 किलो सोन्यापैकी 78 टक्के म्हणजे 150.5 किलो शुद्ध सोने हाती आले आहे. म्हणजेच 43 किलो सोने भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. सन 2008-12 दरम्यान अर्पण झालेल्या 8,163 किलो चांदीपैकी फक्त केवळ 2,381 किलो शुद्ध चांदी काढता आली. म्हणजेच 5,782 किलो चांदी अशुद्ध ठरली. शुद्ध सोन्याचांदीच्या दागिन्यांची नंतर नाणी पाडून ती भाविकांना स्मृतिचिन्ह म्हणून विकली जातात.