आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dont Send Kids To Convent Schools Say Namaste Not Hello Goa Ministers Wife

गोवा: 'मुलांना कॉन्व्हेंट मध्ये शिकवू नका, बलात्कार थांबतील', मंत्र्यांच्या पत्नी बडबडल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतरचे वादळ अजून शमले देखील नाही तर, त्यांच्या सरकारमधील मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लता ढवळीकर यांनी बलात्काराच्या घटना थांबवायच्या असतील तर मुलांना कॉन्व्हेंट शाळेत पाठवणे बंद करा, असा सल्ला दिला आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर, महिलांनी टाइट जिन्ससारखे कपडे वापरणे बंद केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. लता या सनातन संघटनेच्या पदाधिकारी असून रविवारी गोव्यातील मार्गो येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मंत्री ढवळीकरांनी मात्र मौन बाळगले आहे.
लता ढवळीकर यांनी बलात्कारासाठी वेस्टर्न कल्चर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, 'पालकांनी आपल्या मुलांना वेस्टर्न कल्चरपासून दूर ठेवले पाहिजे. यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत पाठवणे बंद केले तर त्यांच्या डोक्यात वस्टर्न कल्चरचे भूत शिरणार नाही. आपल्याकडे डोळे बंद करुन वेस्टर्न कल्चर स्विकारले जाते. त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे.'
त्या म्हणाल्या, 'हिंदू पूरुषांनी घरातून बाहेर पडतानी भाळी टिळा लावावा, तर महिलांनी भांगात सिंदूर भरला पाहिजे. एक जानेवारी रोजी नववर्षाचे स्वागत करण्याऐवजी गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष साजरे केले पाहिजे. फोनवर संभाषण करताना कोणी हॅलो म्हटले तर तुम्ही त्यांना नमस्ते म्हटले पाहिजे.'
महिलांना सल्ला देताना लता म्हणाल्या, 'पूर्वीच्या काळी महिला भांगात सिंदूर भरत होत्या आता कपाळी कुंकू लावणे देखील महिलांना आवडत नाही. त्याउलट टाइट आणि अंगप्रदर्शन करणारे वस्त्र महिलांना अधिक आवडतात. केस कापणे आता फॅशन झाली आहे.'

लता ढवळीकरांच्या या वक्तव्यावर मंत्री महोदयांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला.