आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा ठिय्या, मंत्र्यांचे राजभवनासमोर धरणे, पंजाबचे शिक्षणमंत्री चिमा यांच्या निवासस्थानातील नाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - पंजाबचे शिक्षणमंत्री डॉ. दलजितसिंग चिमा यांच्या निवासस्थानी शनिवारी चांगलेच नाट्य रंगले होते. आंदोलन करणारे शिक्षक सुरक्षा रक्षकांना ढकलून चिमा यांच्या निवासस्थानी घुसले आणि त्यांनी ठिय्या दिला. पोलिसांनी प्रयत्न करूनही ते जागचे हलले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या चिमा यांनी राजभवनाच्या बाहेर धरणे धरले.  

या नाट्याची माहिती देताना चिमा म्हणाले की, ‘पंजाबमधील १०० ईटीटी शिक्षक कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी माझ्या घराबाहेर जमले होते. मात्र, ते नियमात बसत नाहीत. त्यांना मला भेटायचे होते. सुरक्षा रक्षकांना ढकलून देऊन त्यांनी निवासस्थानात प्रवेश केला, पण निवासस्थानी येताच त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. ईटीटी शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, पण ते लो मेरिट प्रवर्गात येत असल्याने नियमानुसार त्यांची नियुक्ती करता येत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. तरीही ते आपल्या मागणीवर ठाम होते. हा परिसर सोडून बाहेर जा, असे त्यांना नम्रपणे सांगण्यात आले, पण ते आपल्या भूमिकेवर अडून राहिले. त्यामुळे अखेर चंदिगड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, पण कारवाई करण्यात पोलिसही अपयशी ठरले.’ 
 
चिमा यांनी तक्रार नोंदवूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चिमा यांनी शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राजभवनाबाहेर धरणे दिले. त्याबाबतची भूमिका सांगताना चिमा म्हणाले की, ‘पोलिस कारवाई करतील, यासाठी मी साडेनऊपर्यंत वाट पाहिली, पण तसे झाले नाही. दुसरा पर्यायच राहिला नसल्याने मला तीन तास धरणे आंदोलन करावे लागले. मी आंदोलनाला बसलो तेव्हा राज्यपाल राजभवनात नव्हते. मध्यरात्रीनंतर राज्यपाल आले. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंदिगडचे पोलिस महानिरीक्षक टी. एस. लुथरा यांना बोलावले आणि माझ्या निवासस्थानातून निदर्शकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. पोलिसांनी निदर्शकांना बाहेर काढले, पण तोपर्यंत पहाटेचे चार वाजले होते.’  

पोलिसांच्या अपयशामुळेच धरणे आंदोलन : चिमा  
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात चंदिगड पोलिस आणि अधिकारी अपयशी ठरले. त्यामुळेच मला उपोषणाला बसावे लागले. अशा प्रकारे कॅबिनेट मंत्र्यालाच उपोषण करावे लागत असेल तर मग सामान्यांचे काय, असा प्रश्नही डॉ. चिमा यांनी विचारला.  
बातम्या आणखी आहेत...