आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूमुळे तीन गावांमधील लोकांचे सरासरी वयोमान आले 40 वर्षांवर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 सिंघारसी (झारखंड) - तीन वर्षांपूर्वी रामूचे हात-पाय अचानक सुजले होते. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेले तेव्हा त्याचे यकृत जवळपास पूर्ण खराब झाले असल्याचे स्पष्ट झाले. पैसे नव्हते, त्यामुळे चांगले उपचारही मिळू शकले नाहीत. भयंकर वेदना आणि संघर्षानंतर वयाच्या फक्त ३२ व्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी रामूचा मृत्यू झाला. मोहाच्या फुलांपासून गावात तयार केलेल्या दारूचे व्यसन हे मृत्यूचे कारण. 
 
रामूसारखीच कहाणी आणि वेदना पाकूड जिल्ह्यातील बलामी, मडगावा आणि मामामोड या तीन गावांतील अनेक कुटुंबीयांच्या आहेत. या गावांतील लोकांना मोहाच्या दारूची एवढी सवय झाली आहे की तेथील लोकांचे सरासरी वय ४० वर्षे एवढेच झाले आहे. याउलट देशभरात गेल्या पाच वर्षांत सरासरी वयोमान पाच वर्षांनी वाढले आहे. या तीन गावांत बहुतांश आदिवासी लोकच राहतात. त्यांची सुमारे ६० घरे असून तेथे १८० कुटुंबे राहतात. तेथे ३० वर्षांवरील महिला-पुरुष अत्यंत कमजोर आणि वृद्ध दिसायला लागतात. रांची येथील इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड मॅनेजमेंटने आपल्या संशोधनात त्यांचे सरासरी वय कमी होत असल्याचे म्हटले आहे. संस्थेने २०१६ मध्ये एक अहवाल जारी केला होता. २००१ मध्ये तेथील लोकसंख्या ६१ हजार १२१ होती, तीत २०११ पर्यंत २४.३३ टक्के घट होऊन ती ४६ हजार २२२ एवढीच राहिली. म्हणजे लोकसंख्येत १४ हजार ८९९ एवढी घट झाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे मोहापासून तयार देशी दारू. त्यांचे सरासरी वय ४० वर्षे झाले आहे, असेही याच संस्थेने सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात पुरुष आणि महिलांच्या सरासरी वयात पाच वर्षांची वाढ झाली आहे. २०११-१५ दरम्यान पुरुषांचे वय वाढून ६७.३ वर्षे आणि महिलांचे ६९.६ वर्षे झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...