आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: आईसाठी अातुर माकडाच्या पिलामुळे साेडली बंदूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहिमा (नागालँड) - नागालँडमधील अंगामी तांड्यावरील लोक शिकार करणे आणि बंदूक बाळगण्याच्या परंपरेसाठी ओळखले जातात. परंतु खोनोमामधील मायकेल मेगोविसा सोफी या तरुण शिकाऱ्याने स्वत:चा स्वभाव बदलला. पूर्वी जंगलात एखादा प्राणी किंवा पक्षी दिसला की त्याला गोळी मारण्याचे प्रकार घडायचे. परंतु याला रोखण्यासाठी त्या तरुणाने तांड्यावरील लोकांचेही मन बदलले. गावातील लोकांसोबत मिळून या तरुणाने प्राणिमात्रांवर भूतदया दाखवली असून परिसराचे रूपांतर अभयारण्यात केले आहे.

मायकेल हे तांड्यावरील सर्वात निष्णात शिकारी असून प्रमुख नेते बनले आहेत. दरदिवशी शिकार करण्यासाठी मायकेल बरेच प्रसिद्ध होते. रानडुक्कर, हरिण, माकड यांना संपवण्याचा त्यांना छंद होता. परंतु केवळ एका घटनेने त्यांचे जीवन बदलून टाकले. एके दिवशी ते शिकार करण्यासाठी निघाले हाेते. समोरील झाडावर हालचाल झाल्याचे पाहून मायकेल यांनी ट्रिगर दाबला. तितक्यात मादी माकड खाली पडले. काही वेळानंतर एक पिल्लू त्या माकडाला बिलगले. रक्ताने माखलेले माकड तडपत होते. थोड्या वेळाने त्याचा अंत झाला. ते पिल्लू सैरभैर झाले. हे दृश्य पाहून मायकेलला खूप दु:ख झाले. त्या दिवशी घरी गेल्यानंतर त्यांनी आता शिकार करायची नाही, असे ठरवले आणि पुन्हा कधीही बंदूक हातात घेतली नाही.
नागालँडची राजधानी असलेल्या कोहिमापासून जवळपास २० किमी अंतरावरील खोनोमा गावातील मायकेल सोफी यांनी या घटनेनंतर संपूर्ण समुदायाने शिकार सोडावी यासाठी ग्रामस्थांना प्रेरित करण्याचे काम सुरू केले. याचदरम्यान शेजारी गावातील तिसिली साखरी हे शिकार आणि जंगलतोडीच्या विरोधात अभियान चालवत होते. झाडांची कत्तल अशीच चालू राहिली तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचे ते सांगत होते. त्यांची व मायकेल यांची एकदा भेट झाली. त्यांनी एक योजना बनवली. मायकेल यांच्या कथेतून अंगामी तांड्यातील तरुण बरेच प्रेरित झाले. नवीन पिढीने शस्त्र उचलणे बंद केले. समुदायातील ज्येष्ठही या अभियानात सामील झाले. परिसरातील २० चौरस किमी भागाला अभयारण्यात बदलण्यात आले.
सध्या पूर्ण परिसर हिरवळीने सजला आहे. प्राणी आणि पक्ष्यांच्या जिवालाही धोका नाही. आमच्या प्रयत्नांना प्रशासनाची साथ मिळाली. यात जवळपास १४ पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागला. सध्या खोनामा अभयारण्य बनले आहे. बदलत्या जगासह आमचे विचारही बदलले आहेत हे समुदायातील तरुणांनी दाखवून दिले.
- मायकेल मेगोविसा सोफी.
बातम्या आणखी आहेत...