आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दार्जिलिंग हिल्समध्ये दुर्गापूजेवर अनिश्चिततेचे सावट, 75 दिवसांपासून सुरू आहे बेमुदत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार्जिलिंग- स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी १५ जूनपासून म्हणजेच ७४ दिवसांपासून बेमुदत बंद सुरू असल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या दुर्गा पूजेवर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. बंद मागे घेतला जाण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने दुर्गा पूजा संयोजकांनी एक तर पूजा रद्दच केली आहे किंवा मग हा उत्सव लहान प्रमाणात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा सण. तो या वर्षी २६ ते ३० सप्टेंबर या काळात होत आहे. दार्जिलिंग खोऱ्यात सुमारे २०० वर्षांपासून दुर्गा पूजेची परंपरा आहे.  

कुर्सिआंगमधील बंगाली संघटना गेल्या शंभर वर्षांपासून येथील राजराजेश्वरी हॉलमध्ये दुर्गा पूजा महोत्सव आयोजित करते. ब्रिटिश काळातील हा राजराजेश्वरी हॉल जुलै महिन्यात उपद्रवखोरांनी जाळून टाकला. संघटनेच्या एका सदस्याने सांगितले की, “दुर्गा पूजा आयोजित करण्यासाठी आमच्याकडे निधीच नाही. प्रचंड अनिश्चितता असल्याने या वर्षी पूजा आयोजित करायची नाही, असा निर्णय सुरुवातीला आम्ही घेतला होता. अजूनही मूर्ती कुठे मांडायची हे निश्चित नाही. त्यामुळे आम्ही यंदा लहान प्रमाणात महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. आम्हाला मंडप तयार करावा लागेल. या वर्षी दुर्गादेवीची मूर्तीही आकाराने खूप लहान असेल.” या संघटनेच्या कुठल्याही सदस्याला आपले नाव सांगण्याची इच्छा नाही. स्वतंत्र गोरखालँडचे समर्थक कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.  

दार्जिलिंगमधील बंगाली संघटना गेल्या १०० वर्षांपासून नृपेंद्र नारायण बंगाली हिंदू हॉलमध्ये दुर्गा पूजा आयोजित करते. संघटनेचे सदस्य शुभोमॉय चटर्जी म्हणाले की, “ या वर्षी आम्ही दुर्गा पूजा आयोजित करू, पण आमचे बजेट अत्यंत मर्यादित आहे. कारण आम्ही कोणाकडूनही पूजेसाठी वर्गणी गोळा केलेली नाही आणि आम्हाला चांगला प्रायोजकही मिळालेला नाही. अनेकांकडून धमक्या मिळत असल्याने सुरुवातीला आम्ही महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर लहान प्रमाणात आयोजन करण्याचे ठरवण्यात आले.”  

गोरखालँड समर्थकांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी तसेच पाच दिवसांच्या या महोत्सवाची पूर्वतयारी न झाल्याने अनेक लहान पूजा समित्यांनी पूजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कालिमपाँग येथील एका पूजा समितीच्या सदस्याने सांगितले की, “ या वर्षी आमची कुठलीही तयारी झालेली नाही. येत्या आठवडाभरात बेमुदत बंद मागे घेण्यात आला तर आम्ही काही नियोजन करू.’

आयोजनासाठी सर्वतोपरी मदतीची तयारी : राय
जीजेएमचे ज्येष्ठ नेते आणि दार्जिलिंगचे आमदार अमरसिंग राय यांनीही दार्जिलिंग हिल्स भागात दुर्गा पूजेच्या आयोजनाबद्दल अनिश्चितता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘पूजा आयोजित होईल की नाही हे मला खरोखर माहिती नाही. तरीही लहान प्रमाणात का होईना, ती साजरी होईल, अशी मला आशा वाटते. आयोजनासाठी कुठल्याही प्रकारची मदत करण्यास मी तयार आहे.’
बातम्या आणखी आहेत...