आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळमधील कैद्यांच्या हाती लवकरच ई-बुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - केरळमधील कैद्यांच्या हाती लवकरच ई-बुक्स पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी तुरुंगाच्या परिसरात डिजिटल लायब्ररी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा दक्षिण भारतातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

पूजापुरा केंद्रीय तुरुंगात ही सुविधा मिळणार आहे. तुरुंगात १ हजार ३०० कैदी आहेत. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कैद्यांना ग्रंथांचे अमर्याद विश्व खुले होणार आहे. कैद्यांमध्ये वाचनाची सवय रुजावी, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल व्हावेत, या उद्देशाने ही डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या ग्रंथालयाच्या उभारणीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यासाठी टॅब दिला जाईल.

कैद्यांना केवळ डिजिटाइज ग्रंथांचा संग्रह मिळणार नाही, तर ई-बुक्सची सहज सुविधाही मिळेल, असे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, त्याचा सारांश इत्यादी माहिती देणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल.

प्रशिक्षण देणार
कैद्यांना ई-बुक्स वाचनासाठी गॅजेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या आवडत्या विषयाचे पुस्तक सहजपणे वाचता येणार आहे. ई-लायब्ररीमुळे त्यांना केवळ वाचनाची गोडीच लागणार नाही तर ई-साक्षर होण्याचीही त्यांना संधी मिळेल, असा विश्वास तुरुंग व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बराकीमध्ये वितरण
तुुरुंगात विविध प्रकारच्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना त्यांच्या बराकीमध्ये वाचनासाठी साहित्याचे वितरण केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती तुरुंग अधीक्षक एस. संतोष यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...