रांची (झारखंड) - नक्षलवादी संघटना चालवणे आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या आरोपानंतर राजीनामा देऊन फरार असलेले झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव यांना सीआयडीने अटक केली आहे. सीआयडीच्या स्पेशल टीमने रविवारी सकाळी त्यांना दिल्लीतील आरके पुरम येथून अटक केली आहे. त्यांना आज रांचीला घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर हजारीबाग कोर्टात सादर केले जाईल. सीआयडी चौकशीसाठी योगेंद्र यांच्या रिमांडची मागणी करण्याची शक्यता आहे.
झारखंडचे डीजीपी राजीव कुमार यांनी योगेंद्र यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. यागेंद्र 14 सप्टेंबरपासून फरार होते. त्यांच्यावर झारखंड टायगर्स ग्रुप आणि झारखंड बचाओ आंदोलन या दोन नक्षलवादी संघटनांचे संचालन करण्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. पोलिसांना विश्वास होता, की ते आत्मसमर्पण करतील, मात्र ते फरार झाले. त्यानंतर हजारीबाग येथील न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. जवळपास 15 दिवस पोलिसांना चकमा दिल्यानंतर सीआयडीने त्यांना अटक केली आहे.
(छायाचित्र - माजी मंत्री योगेंद्र साव यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये गुन्हेगार राजू साव (लाल वर्तूळात))