तिरुवनंतपुरम - केरळचे माजी क्रीडामंत्री ई. पी. जयराजयन यांच्यावर माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जने अपमान करणे आणि धमकावण्याचा आरोप ठेवला आहे. अंजू यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडेही तक्रार केली आहे.
अंजूने २००३ च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचला आहे. सध्या त्या केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. अंजू म्हणाल्या, राज्यात डाव्या आघाडीचे(एलडीएफ) सरकार स्थापन झाल्यानंतर सात जून रोजी परिषदेच्या उपाध्यक्षांसोबत क्रीडामंत्र्यांना भेटण्यास गेले होते. पहिल्याच बैठकीत मंत्री म्हणाले, तुम्हा सर्वांना मावळत्या(काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ) सरकारने नियुक्त केले आहे. तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या समर्थक आहात. आता एलडीएफची सत्ता आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण परिणाम भोगण्यास तयार राहा. तुम्ही ज्या काही नियुक्त्या आणि बदल्या करत आहात त्या बेकायदा आहेत. परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मी बंगळुरूहून तिरुवनंतपुरमला गेले होते. मंत्र्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. हे नियमाविरुद्ध आणि भ्रष्टाचार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. अंजू यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी मंत्र्याचीच बाजू घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या सरकारने अंजू यांना अनेक सवलती दिल्या होत्या. हे योग्य नाही.