आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive: Bhaskar Interview: NDA Leaders Trapped Me Laluprasad Yadav

Exclusive: रालोआ नेत्यांनीच मला अडकवले - लालूप्रसाद यादव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारा घोटाळ्यावर लालू यांनी मीडियाशी कित्येकदा संवाद साधलेला आहे. मात्र, या वेळी त्यांनी तत्कालीन सीबीआय अधिकारी व रालोआ नेत्यांविषयी गौप्यस्फोट केला. या व अनेक विषयांवर ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने लालूंशी साधलेला संवाद...
प्रश्न : शिक्षा भोगत असलेल्या खासदार-आमदारांचे सदस्यत्व अबाधित ठेवणारा अध्यादेश राहुल गांधी यांनी रद्द करून एक प्रकारे तुमच्यावरच नेम साधला. तरीही तुम्ही राहुल यांचेच गुणगान गात आहात, असे का?
उत्तर : यात सत्यता नाही. लोकांची दिशाभूल झाली आहे. तुम्ही ज्या अध्यादेशाबद्दल सांगत आहात तो सर्वपक्षीय बैठकीतील एकमताच्या आधारावर तयार करण्यात आला होता. राहुल यांचे पाऊल योग्यच होते.
प्रश्न : तुमच्या राजकीय शत्रूंचे आपसातच शत्रुव निर्माण झाले आहे. तुम्ही शत्रू नं.1 कोणाला समजता? नितीश वा नरेंद्र मोदी यांना?
उत्तर : नितीश हे कमालीचे लोभी आहेत. सत्ता उपभोगण्यासाठी ते भाजपच्या गोटात सामील झाले. नितीश यांच्यावर हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांच्या काही ओळी मला आठवतात, ‘दो पैसे का फायदा जहां मिले वहीं जाऊंगा’... आमच्यासाठी नितीश व मोदी हे सारखेच शत्रू आहेत.
प्रश्न : चारा घोटाळ्यात तुम्हाला कुणी अडकवले? काँग्रेस की नितीशने? तुम्ही स्पष्टपणे का बोलत नाही?
उत्तर : नाही, नाही, काँग्रेस नाही. मी तर रालोआची शिकार ठरलो. चारा घोटाळ्याच्या तपासात आपले नाव समोर येत आहे, असे मी जेव्हा नितीश यांना बिहार भवनमध्ये सांगितले तेव्हा ते धावतपळत जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे गेले. रालोआ नेत्यांनी सीबीआय अधिकारी यू.एन. बिस्वास यांच्याशी संधान साधून मला फसवले. या बदल्यात बिस्वास यांना राज्यपालपदाची बक्षिसी मिळणार होती. मी दुमका येथून लगेचच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना फोन करून बिस्वास यांना राज्यपाल करण्यास विरोध दर्शवला. अटलजींबाबत माझ्या मनात अतीव आदर आहे. त्यांनी माझ्या विरोधाचा मान ठेवला. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले यू.एन. बिस्वास सध्या पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री आहेत. मी आधीपासूनच म्हणतोय की, रालोआ नेत्यांनी कारस्थान रचून मला अडकावले आहे. पशुपालन विभागात बजेटपेक्षा अधिक रक्कम काढण्याप्रकरणी मीच खटला दाखल केला होता, मात्र सीबीआयने यात मलाच आरोपी करून टाकले.
प्रश्न : नितीशकुमार यांनी फक्त ‘गुंडाराज’चा उपद्रव कमी करून लोकांची मने जिंकली? तुम्ही असे का करू शकला नाही? तुमच्या कार्यकाळात गुन्हेगारांना प्रोत्साहन का मिळत राहिले?
उत्तर : हे माझ्या राजवटीविरुद्ध विरोधकांच्या अपप्रचाराचे फलित असल्याचे समजा. माझ्या कार्यकाळात अपहरण-खंडणीच्या गुन्ह्यांतील गुन्हेगार आता जदयूत नेते बनलेले आहेत. कुख्यात गुन्हेगारांना आधी जदयूत सहभागी करून आता त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्याचे नाटक केले जात आहे. याचाच परिणाम म्हणजे सुशासनाचा दावा करणा-या नितीशच्या राज्यात औद्योगिक गुंतवणूक मात्र शून्य आहे.
प्रश्न : छपरातील तुमच्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवेल? नातेवाइक की कार्यकर्ता. राजदचे भविष्य कुणात आहे? राबडी, धाकटा मुलगा तेजप्रताप की कन्या मिसामध्ये?
उत्तर : हे ठरवणारे आम्ही कोण? छपराची जनता व आमचे कार्यकर्ता याचा निर्णय घेतील. आपल्याच मनाने सर्व काही ठरवायचे म्हटले तर तो घोडेबाजार होईल. आता जेव्हा तुरुंगातून बाहेर आलो आहे तेव्हा माझ्यासोबत कोण दिसतंय? पत्नी, मुलं व राजकीय सहकारीच सोबत आहेत. संकटात असताना कुटुंबातील सदस्यांचा सक्रीय पाठिंबा मिळणारच होता.
प्रश्न : बिहारमध्ये नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढतोय. ‘आप’ही तेथे पाय रोवत आहे. नितीश तर आहेतच. यात तुमच्या पक्षाचे भवितव्य काय दिसतेयं?
उत्तर : तुम्हाला कुठे दिसतोय मोदींचा वाढता प्रभाव? नितीशकुमार यांनी तर सिद्धांतांना फाटा देऊन खुर्चीच्या लोभापायी अन् बिहारमधून लालूंना संपवण्यासाठी भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता. आता बिहारमध्ये भाजपने पाय रोवल्यामुळे नितीश धर्मनिरपेक्ष होण्याचे नाटक करत आहेत. बिहारमध्ये भाजपची हवा फुस्स होईल. येथील लोकांची मने जातीयवादी नाहीत. बिहार हा लालूचा इलाखा आहे. नितीश यांचा पूर्ण बीमोड झाल्याचे आगामी दिवसांत दिसेलच. मुकाबला तर राजद व भाजपमध्ये होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पाच जागांची मागणी धुडकावून आम्ही घोडचूक केली होती. मात्र यंदा काँग्रेससोबत आम्ही आघाडी असेल. बिहारमध्ये राजद-काँग्रेस-लोजपा ही आघाडी सर्वांचे सुपडे साफ करेल. बिहारमध्ये आमचे द्वंद्व भाजपही होईल. नितीशचा तर सवालच नाही, ना निवडणुकीत त्यांचे अस्तित्व राहील. बिहारमध्ये ‘आप’ पार्टी ‘तुम’ होऊन जाईल.
दुसरा ब्लर्ब :
लालू आकसबुद्धीने बोलत आहेत : जदयू
जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह म्हणाले की, लालू प्रसाद यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. ईर्ष्या व द्वेषापोटी लालू असे बोलत आहेत. यू.एन. बिस्वास व नितीशकुमार यांच्यावर असे बेछूट आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात असे काही घडलेच नव्हते.