आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 मिनिटे धुमश्चक्री, बिबट्याच्या जबड्यात हात घालून चक्क जीभ पिरगाळली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी- साठीतील शेतकरी बिबट्यात १५ मिनिटांच्या थरारक संघर्षाची घटना मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानात घडली. बलारपूर जंगलात मंगळवारी रामकिशन गुर्जर हे मंदिरात जात होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर तीव्र प्रहार करत त्यांचा चेहरा रक्तबंबाळ केला.

डोक्यावरही पंजे मारले. मात्र, रामकिशन यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी थेट बिबट्याच्या जबड्यात हात घातला. त्याची जीभ धरून पिरगाळली. बिबट्या पुरता नामोहरम झाला. तो जोवर गुडघे टेकत नाही तोवर जीभ सोडली नाही. रामकिशन यांनी हात सैल केला अन् बिबट्याने एकच धूम ठाेकली. या अवस्थेत रामकिशन सात किमी चालत भरकुनी गावात पोहोचले. तेथे लोकांनी १०८ क्रमांकावर फोन केला, पण रुग्णवाहिका आली नाही. लोकांनी खासगी वाहनाने रामकिशन यांना जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. हल्ल्यात रामकिशन यांच्या शरीरावर २५ पेक्षा जास्त जखमा झाल्या आहेत.

रामकिशनगुर्जर यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच तोंडून...
शिवपुरीच्या जिल्हा रुग्णालयात जखमी रामकिशन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
> मी सकाळीपायीच मंदिरात दर्शनासाठी निघालो. रस्त्यात गतवाएजवळ नदीत पाणी असल्याने त्यात अंघोळ करू लागलो. इतक्यात मागून बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. मी कोसळलो. सावरेपर्यंत त्याने अनेक पंजे मारले. पहिला डोक्यावर, दुसरा चेहऱ्यावर. त्याने माझा हात जबड्यात धरला. दुसरा हात पायाने दाबून धरला. मी जखडून गेलो. त्याने मला १० फूट फरपटत झाडीत नेले. दरम्यान त्याची पकड थोडी सैल झाली, मी जबड्यातून हात सोडवून घेतला. मी ओरडत होतो. पण रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. बिबट्या पुन्हा माझ्यावर चाल करून येत होता. आता माझ्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. मरायचंच असेल तर लढून मरू, असा विचार केला. बिबट्या जसा जवळ आला तसा मी पूर्ण शक्तिनिशी माझा हात त्याच्या जबड्यात घातला. त्याची जीभ हाती लागली. ती मी जोरात पिरगाळून बाहेर ओढली. या प्रत्युत्तराने बिबट्या गोंधळला. वेदनेमुळे मागेमागे हटू लागला. कळ लागल्याने माझा हात सैल झाला तर बिबट्याने थेट झाडीत धूम ठोकली. मी कसाबसा रुग्णालयात पोहोचलो.
बातम्या आणखी आहेत...