आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farooq Abdulla News In Marathi, Electricity Stealing, Kashmir

विजेच्या चोरीमध्ये काश्मिरी केवळ चोरच नव्हे, तर महाचोर - केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - विजेच्या चोरीमध्ये काश्मिरी केवळ चोरच नव्हे, तर महाचोर आहेत, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सोमवारी केले. त्यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून फारूक यांनी माफी मागावी, अशी मागणी करून विरोधकांनी सोमवारी काश्मीर विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला.


फारूक यांनी रविवारी दिल्लीत एका समारंभात हे वादग्रस्त विधान केले होते. त्याचे पडसाद सोमवारी राज्य विधिमंडळात पडल्याचे दिसून आले. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार इंजिनिअर रशीद अहमद यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात व्यत्यय आला. काही सदस्य सभागृहाबाहेर गेले. त्यामुळे कामकाज होऊ शकले नाही. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) सदस्यांनी या मुद्द्यावर फारूक अब्दुल्ला यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सची राज्यात सत्ता असून ते पक्षाचे प्रमुख आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ते वडील आहेत. दरम्यान, माफी मागण्यावरून पीडीपीच्या प्रमुख महेबुबा मुफ्ती यांनी सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल बोलताना अब्दुल्ला म्हणाले, माफीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. उलट माफी त्यांनीच मागावी, कारण त्याच खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम करत आहेत.


भीषण वीज समस्या
काश्मीरमध्ये विजेची भीषण समस्या आहे. एकीकडे फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालेले असतानाच सोमवारी राज्याने सौर ऊर्जेसाठी एक सहमती करार केला. केंद्र सरकारच्या पुनर्निर्माण ऊर्जा खात्यासोबत हा करार झाला. त्यानुसार 7 हजार 500 मेगा वॉटचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. करारावर उच्च्स्तरीय बैठकीत स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.


नेमके काय म्हणाले फारूक ?
राज्याला दोन-तीन हजार कोटी रुपये देऊन वीज विकत घ्यावी लागते, परंतु वीजचोरीमुळे राज्याला त्यातून पुरेसा पैसा परत मिळत नाही. चोरटे वाढले आहेत. काश्मिरी केवळ चोरटे नाहीत, तर महाचोर आहेत.


मीडियाकडून विपर्यास
माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. वीज चोरीचा फटका देशभरात बसतो. त्याचा परिणाम वितरण आणि सेवेवर पडतो, एवढेच मला म्हणायचे होते. परंतु प्रसारमाध्यमांनी त्याचा विपर्यस्त अर्थ काढला. मी काश्मिरींना चोरटे म्हणालो नव्हतो. परंतु निवडणुकीमुळे गैरसमज पसरवण्यात येत आहे. फारूक अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री