आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट: अबू सालेम, मुस्तफा डोसासह 6 दोषी, कय्युब निर्दोष, 19 जूनला शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सालेमला २७ मे रोजी कोर्टात नेताना (संग्रहित छायाचित्र) - Divya Marathi
सालेमला २७ मे रोजी कोर्टात नेताना (संग्रहित छायाचित्र)
मुंबई - १९९३मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी गँगस्टर अबू सालेम याच्यासह सहा आरोपींना विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. गुजरातमधील भडोच येथून मुंबईपर्यंत शस्त्रास्त्रे पोहोचवल्याप्रकरणी सालेमला दोषी ठरवण्यात आले. तर आरडीएक्स भारतात आणल्याप्रकरणी मुस्तफा डोसा, अतिरेक्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवल्याप्रकरणी  ताहिर मर्चंट, शस्त्रास्त्रे मुंबईत आणण्यासाठी मारुती व्हॅन पुरवल्याप्रकरणी रियाज सिद्दिकी, अशाच प्रकरणात फिरोज अब्दुल रशीद खान व करिमुल्ला खान यांना दोषी ठरवण्यात आले.  संजय दत्तला एके-४७ दिल्याच्या आरोपातून अब्दुल कय्युम याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या दोषींना सोमवारी (१९ जून) शिक्षा सुनावली जाणार आहे.
 
अबू सालेम याला पोर्तुगालमधून प्रत्यार्पण कराराअंतर्गत भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे या करारानुसार त्याला फाशी किंवा आजीवन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर त्याला २५ वर्षांपर्यंत तुरुंगवास ठोठावला जाऊ शकतो. या सातही आरोपींवर हत्या, गुन्हेगारी कट आणि देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने देशद्रोहाचे आरोप मात्र फेटाळले. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, ७१३ लोक जखमी झाले होते. यात सुमारे २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

सात आरोपींवर असे होते आरोप
1) अबू सालेम : बॉम्बस्फोटाचा कट रचला, शिवाय गुजरातमधून मुंबईपर्यंत शस्त्रास्त्रे आणण्यास मदत केली. ती कटातील सहभागी इतर दोषींपर्यंत पोहोचवली. मारुती व्हॅनमधून ही शस्त्रास्त्रे त्याने आणली. संजय दत्तच्या घरात दोन एके-५६ रायफली, २५० गोळ्या आणि हातबॉम्ब हस्तकामार्फत ठेवले. १८ जानेवारीला ते पुन्हा ताब्यात घेतले.
2) मुस्तफा डोसा : आरडीएक्ससह इतर स्फोटके भारतात आणण्याच्या कटातील मास्टरमाइंड. हा कट रचून तो यशस्वी व्हावा यासाठी काही युवकांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवले.
3) ताहिर मर्चंट : मुंबईतील काही लोकांना याने शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानात पाठवण्यास मदत केली. शस्त्रे खरेदी करण्यासाठी पैसे उभे केले.
4) रियाज सिद्दिकी : भडोचमधून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके भारतात आणण्याच्या कामी अबू सालेमला मारुती व्हॅन पुरवली. या व्हॅनमध्ये कप्पे करून शस्त्रास्त्रे लपवण्यात आली.
5) फिरोज अब्दुल राशिद खान : दुबईत कटासंबंधी बैठकीत सहभागी होता. कस्टम अधिकाऱ्यांशी संगनमताने शस्त्रे व स्फोटके भारतात आण्ण्यास मदत केली.
6) करिमुल्ला खान : मित्राला पाकिस्तानात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले. शस्त्रे व स्फोटके भारतात आणण्यात मदत केली.
7) अब्दुल कय्युम : संजय दत्तकडे एके-५६सह स्फोटके पोहोचवल्याचा आरोप. मात्र, याबाबत ठोस पुरावे नसल्याने अखेर निर्दाेष मुक्तता.

- या प्रकरणात फिर्यादींच्या वतीने ७५० आणि इतर ५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. शिवाय सालेमसह तीन आरोपींनी गुन्हा कबूल केला होता.
- दुसऱ्या महायुद्धानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर आणि नुकसान झालेला हा जगातील पहिला दहशतवादी हल्ला होता.

मुंबई स्फोटातील दुसरा निकाल
या प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा दुसरा निकाल आहे. २००७ मध्ये याच प्रकरणात १०० आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते आणि २३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली.

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील शेवटचा निकाल
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील हा शेवटचा खटला होता. सध्या या प्रकरणात इतर एकही आरोपी ताब्यात नाही. मात्र, ३३ फरार आहेत. यात स्फोटाचा कट रचणारा दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम, मुस्तफा डोसाचा भाऊ मोहंमद डोसा आणि टायगर मेमन यांचा समावेश आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कधी आणि कुठे झाले होते बॉम्बस्फोट...