बंगळुरु - येथील दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीसोबत गेल्या आठवड्यात छेडछाडीची घटना घडली होती. रस्त्यावर मागून आलेल्या एका वाहनाने तिला टक्कर दिल्यानंतर ती तिच्या वाहनासह रस्त्यावर पडली. त्यानंतर तेथील काही लोकांनी तिला मदत करण्याएवजी तिच्यावर अपशब्दांचा मारा केला. तरुणीने पोलिसांत तक्रार दिली नाही, मात्र तिने या घटनेची सविस्तर माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधित करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
काय आहे घटना
तरुणीचे म्हणणे आहे, की एका 45 वर्षांच्या व्यक्तीने तिच्या वाहनाला मागून टक्कर दिली त्यामुळे ती रस्त्यावर पडली. त्यानंतर टक्कर देणाऱ्या व्यक्तीने तिला शिवीगाळ केली. त्यावेळी आसपास उभे असलेले काही लोक जमा झाले आणि त्यांनी देखील तरुणीलाच दोषी ठरवत तिच्यावर अपशब्दांचा मारा केला. तरुणीचा आरोप आहे, की मी उत्तर भारतीय असल्यामुळे माझ्यासोबत असे वर्तन करण्यात आले. तरुणीचे म्हणणे आहे, की लोकांनी तिला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. तिने एका मित्राला फोन करुन बोलावून घेतले त्यानेच तिची सुटका केली. मात्र जमावाने त्याला देखील मारहाण केली.
पोस्ट मध्ये काय लिहिले
तरुणीने फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले, स्वातंत्र्यदिनी मला जाणीव झाली, की रस्त्यांवरुन मी एकटी कोणत्याही भीतीशिवाय फिरू शकते का ? सर, मी बंगळुरुच्या एका प्रतिष्ठीत इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी आहे. कॉलेज कॅम्पस बाहेर रस्त्यावर माझा अपघात झाल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. माझ्यासोबत छेडछाड करण्यात आली आणि जमावाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी येथे चार वर्षांपासून राहाते. ही कथा फार मोठी आहे आणि वाईट देखील. मात्र मला विश्वास आहे, की तुम्ही तुमचा बहुमुल्य वेळ देऊन ती वाचाल, माझा भारताच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे, कारण 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा त्यांचा उद्देश आहे.