नवी दिल्ली- आसाममधील आमदार गोपीनाथ दास यांच्या येथे काम करणा-या एका चौदा वर्षीय मुलीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पिडीत मुलीने सांगितले की, 29 ऑगस्टला आमदाराने कारमध्ये तिचा बलात्कार केला. नातेवाईकांना सोबत घेऊन तिने बाकूच्या मंदीरा पोलिस ठाण्यात आमदार दास यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या तिला उपचारासाठी गुवाहाटी येथे दाखल करण्यात आले आहे. दास हे ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे (AIUDF) आमदार आहेत. कामरूप जिल्ह्यातील बाकू विधानसभेतून ते निवडून आले आहेत.
आमदार म्हणतात आरोप खोटे
आमदार गोपीनाथ दास यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ' हे सर्व आरोप खोटे असून मी या बाबीचा निषेध करतो. माझ्या राजकीय करियरला डाग लावण्याचा हा कट आहे.' आमदारांनी हे पण सांगितले की, बलात्काराचा आरोप करणारी मुलगी 28 जून ते 05 सप्टेंबर 2015 या कालावधितच त्यांच्या घरी काम करत होती. त्यानंतर तिचे कुटूंबिय तिला घेऊन गेले. ही मुलगी पैसे आणि दागिने घेऊन त्यांच्या घरातून गेली आहे असेही आमदार दास यांनी सांगितले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आमदारांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती कामरूप जिल्ह्याच्या एसपी इंद्राणी बरूआ यांनीही दिली आहे.
आमदार दास यांना अटक करा- विद्यार्थी संघटनांची मागणी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आमदार गोपीनाथ दास यांच्याविरोधात महिला संघटना आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. बाकू पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करून ऑल आसाम स्टुडंट युनियन, ऑल राभा स्टुडंट युनियन, ऑल असमा कूच राजबंशी स्टुडंट युनियन आदी संघटनांनी आमदार दास यांना अटक करण्याची मागणी केली आहे.