हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात न्यायालयात एका कुख्यात गुंडाची एके-४७ रायफलने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत एक कॉन्स्टेबल जखमी झाला.
पोलिस उपमहानिरीक्षक उपेंद्र कुमार म्हणाले, गुंड सुशील श्रीवास्तवला न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात होते, तेव्हा किशोर पांडे टोळीच्या गुंडाने एके ४७ रायफलीतून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये श्रीवास्तव, त्याचा साथीदार गयस खान आणि कलाम ठार झाले. कॉन्स्टेबल देवेंद्र पासवान जखमी झाले. पासवान यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यानंतर गुंडाने एके ४७, एक वाहन आणि एक स्कूटी सोडून बेपत्ता झाला. जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघांमध्ये टोळीयुद्ध
हजारीबागचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार झा म्हणाले, सुशील श्रीवास्तव आणि किशोर पांडे यांच्यात टोळीयुद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी पांडे टोळीच्या दोघांची जमशेदपूरमध्ये हत्या करण्यात आली होती. यामध्ये किशोरचा नातेवाईक गंभीर जखमी झाला होता.