आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांत प्रतिबंधित स्फोटके, स्पर्धात्मक आतषबाजीला परवानगी नाकारण्यात आली होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलम - केरळमधील पुत्तिंगल देवी मंदिरातील आतषबाजीवेळी स्फोटक पदार्थांबाबतच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याने अग्नितांडव घडल्याचे समोर आले आहे. याशिवाय फटाक्यांच्या सुरक्षेची प्राथमिक काळजीही घेण्यात आली नाही.
स्फोटक पदार्थाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे स्फोटक पदार्थ विभागाचे नियंत्रक सुदर्शन कमल यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. कमल स्फोटक पदार्थाची साठवणूक, परवाना आणि वापर या विभागाचे प्रभारी आहेत. आतषबाजीसाठी वापरलेल्या स्फोटकाचा तपास करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. फटाके बनवणाऱ्या कारखान्यांनी बंदी घातलेल्या स्फोटकांचा वापर केला आहे. आतषबाजीवेळी प्राथमिक काळजीही घेण्यात आली नाही.

कोलमच्या जिल्हाधिकारी ए. शैनामोल यांनी मंदिर परिसरातील आतषबाजीसाठी आपल्याकडून परवानगी किंवा नकार देण्यात आलेला नव्हता,असे स्पष्ट केले. मी माझे काम केले. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. परवानगी देण्यास किंवा ती नाकारण्यास विशिष्ट पद्धती असते. आम्ही पोलिस आणि तहसीलदारांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या. मंदिर परिसराची जागा पाहता स्पर्धात्मक पद्धतीच्या आतषबाजीस परवानगी दिली जाऊ नये,असा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, काही जणांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यास आपण सांगितले असल्याचे शैनामोल यांनी सांगितले.

कोलमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शहानवाज म्हणाले, बंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन कोणी केले याची चौकशी केली जाईल. दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, पुत्तिंगल देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव जे. कृष्णकुट्टी पिल्लई यांनी आतषबाजीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. मंदिर समितीचा अर्ज हा अातषबाजीसाठी नव्हे, तर स्पर्धात्मक आतषबाजीसाठी असल्याचे लक्षात अाल्यानंतर तो फेटाळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केले आहे, अशांविरोधात स्फोटक पदार्थ अधिनियम कलम २०८ नुसार कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात मंदिर प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केले की काय याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मंदिराजवळ राहणाऱ्या ८० वर्षीय पंजक्षम्मा यांच्या तक्रारीवरून ८ एप्रिल रोजी वरील आदेश बजावण्यात आला होता. पंजक्षम्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, मंदिर परिसरातील स्पर्धात्मक आतषबाजीवेळी दरवर्षी माझ्या घराचे नुकसान होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत. दरम्यान, दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी पुत्तिंगलमधील स्टोअरहाऊसमध्ये पोलिसांनी किमान १०० किलो स्फोटके जप्त केले. आतषबाजीचे कंत्राट असलेल्या एका व्यक्तीचा मुलगा उमेश याचे हे स्टोअरहाऊस असल्याचे सांगण्यात येते.

समारंभातील आतषबाजीवर बंदी नाही
तिरुवनंतपुरम राज्यातील १२५५ मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने म्हटले की, मंदिरातील आतषबाजीवर कोणतीही बंदी नाही. टीडीबीचे अध्यक्ष पी. गोपालकृष्णन यांनी आतषबाजी मंदिरातील परंपरेचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, ते सरकार आणि न्यायालयाच्या सुरक्षेअंतर्गत पुरेशा सुरक्षात्मक उपायानुसार व्हावयास हवे.

न्यायाधीशांची मागणी | कोच्चीमध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला न्या. व्ही. चितांबरेश यांनी पत्र लिहिले अाहे. त्यात हाय डेसिबल म्हणजे जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी लादण्याची मागणी केली आहे. न्या. टी. बी. राधाकृष्णन आणि अनु शिवरमण यांचे न्यायपीठ १२ एप्रिल रोजी याची सुनावणी करणार आहे.
छायाचित्र: अागरतळा येथे शाळकरी मुलांनी केरळ आग दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.