आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख लोकसंख्येच्या समाजातील पहिली पदवीधर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हैदराबादमध्ये सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेला एक प्राचीन अरबी समुदाय. या समुदायात आतापर्यंत कोणीच महिलांच्या शिक्षणावर भर दिला नाही. मात्र, पहिल्यांदाच एक युवती पदवी पूर्ण करणार आहे. आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादपासून सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर बारकास नावाचे एक गाव वसलेले आहे. प्रथमदर्शी येथील वातावरण
बघितल्यानंतर लगेच या गावाच्या संस्कृतीचा अनुभव येऊन जातो. अरबी संस्कृतीचा वारसा जपलेल्या एक लाख लोकसंख्येच्या बारकासमध्ये लवकरच एका युवतीच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडू पाहत आहे.
मुळातच येथे महिलांच्या शिक्षणाविषयी काहीच संधी नसताना या गावाची राबिया यंदा पदवीचे शिक्षण पूर्ण करणार आहे. राबिया ही अरबच्या खबिला संस्कृतीत जन्मलेली युवती. राबियाने पदवी पूर्ण केल्यानंतर बी.एड.चे शिक्षण घेऊन आपल्या समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी कार्य करावे, असे तिचे वडील हसन बिन अहमद शाकिर यांचे स्वप्न आहे. राबियासुद्धा वडिलांच्या या स्वप्नाला जपत आहे. गावातील मुलींना घराबाहेर पडणे तर खूपच दूरची गोष्ट आहे. मात्र, येथे त्यांचे हात जरी बुरख्याबाहेर दिसले तरी त्यांना ते झाकावे लागते. परंतु सामाजिक रीतीरिवाज पाळत राबिया दररोज शिक्षणाचा ध्यास पूर्ण करत आहे. ती येथील मायसरा सरकारी महाविद्यालयात बी.ए.करत आहे. यापूर्वी समाजातील लोकांनी महिलांच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष दिले नाही. येथील युवक कमाल बारावीपर्यंत शिकलेले आहेत. महिलांना तर पाचवी ते आठव्या वर्गांपर्यंतच मजल मारता आली आहे. हसन बिन अहमद शाकिर यांनी मुलीच्या शिक्षणासोबतच अन्य मुलांचेही शिक्षण व्हावे या उद्देशाने अल फजान शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आहे. ते या गावाचे प्रमुख असल्याने गावातून त्यांना तसा याबाबतीत कोणताही विरोध नाही. राबिया केवळ पुस्तकी अभ्यासातच नव्हे तर इंटरनेटवरही
तितकिच अॅक्टिव्ह आहे. यासाठी तिला भाऊ अहमद बिन सईद बागादी, बिल्लाह सालिब अहाता आणि अब्दुल्ला बिन अबु बक्का शाकिर यांचीही मदत मिळते. हे तिघेही भाऊ सध्या बाराव्या वर्गात शिकत आहेत. त्यांनीही सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभावी वापर करायला सुरुवात केली असून व्हॉट्सअॅप व फेसबुकवर सक्रिय आहेत. राबियाला तिच्या
संस्कृतीतील काही गोष्टी चांगल्या वाटतात. ती सांगते की, आमच्या संस्कृतीत इतर भारतीयांप्रमाणेे हुंड्याची प्रथा नाही.
लग्नाचा खर्चही वरपक्षच उचलतो. परवानगी मिळाल्यास नोकरीही करू शिवाय परदा पद्धतीचा आपल्याला काही त्रास नसून भविष्यात मुलींच्या शिक्षणासाठी भरपूर प्रयत्न करू, अशी अपेक्षा राबिया व्यक्त करते.