आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flood Affected People Came On Street In Kashmir, Divya Marathi

काश्मीर पूरग्रस्तांचा रास्ता रोको, मदत मिळत नसल्याने संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - अस्मानी संकटाने हैराण झालेल्या नागरिकांना येथे मदतीअभावी सुलतानी संकटाचाही मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त शेकडो पूरग्रस्त शनिवारी राजधानीच्या रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

महापुरामुळे श्रीनगर भागातील अनेक भागांत अद्यापही कोणतीही मदत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे पूरग्रस्त संतप्त आहेत. मैसुमा, कोकेर बाझार, लाल चौकमधील शेकडो नागरिकांनी शनिवारी येथील महत्त्वाच्या मार्गांवर जोरदार निदर्शने केली. मैसुमा भागातील अनेक घरे राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित राहिलेली नाहीत. पुरानंतर २१ दिवस उलटले आहेत. अनेक भागांत अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे रोगराई तसेच मोठी गैरसोय होत आहे. त्यानंतरही प्रशासन धिम्या गतीने काम करत असल्याचा पूरग्रस्तांचा आरोप आहे.

एक शाळा सुरू
पुरानंतर राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बहुतांश शाळा २२ दिवसांनंतरही बंद आहेत. परंतु शनिवारी आर्मी पब्लिक स्कूल सुरू झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य हे दोन मुख्य प्रश्न शाळा प्रशासनासमोर आहेत. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ५०० विद्यार्थी आहेत.

मृतांचा आकडा ८५ वर
गुवाहाटी । आसाम आणि मेघालयात आलेल्या महापुरातील मृतांचा आकडा ८५ वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या टीमने शनिवारी याची माहिती दिली. जोरदार पावसामुळे आसाममध्ये ३९, तर मेघालयात ४६ लोकांना प्राण गमवावे लागले. पावसामुळे आसाममधील गोलपारा, कामरूप आणि बोको जिल्ह्यांतील बहुतांश भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेघालयमधील तुरा, गारो हिल्समधील सात जिल्ह्यांत परिस्थिती कठीण बनली आहे.

गुरुद्वारांमध्ये शेकडो आश्रयाला
पुरामुळे हजारो बेघर झाले आहेत. संकटात शीख समुदायाने माणुसकीचा हात पुढे केला आहे. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या गुरुद्वारांमध्ये सध्या शेकडो पूरग्रस्त आश्रय घेत आहेत. शीख समुदायाने दाखवलेल्या आैदार्याबद्दल पूरग्रस्तांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. देशासह जगभरातील विविध शीख संघटनांनीही मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. ब्रिटनमधील खालसा एड, अमेरिकेतील युनायटेड सिख या संघटनांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदा धाव घेतली. या संघटनांचे कार्यकर्तेही पूरग्रस्तांसाठी सर्वात अगोदर राज्यात दाखल झाले होते.
( छायाचित्र - राजबाग येथे पूरग्रस्त भागात वाहनांची झालेली स्थिती.)