जम्मू/श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. राजोरी जिल्ह्यात झेलम नदीला महापूर आला आहे. पुरात बस वाहून गेली आहे. बसमध्ये 50 वर्हाडी होते. त्यापैकी 35 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्येही झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. श्रीनगरमधील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. राज्यातील 30 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुरक्षा दलाच्या एका अधिकारीचा समावेश आहे. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे.
दरम्यान जोजिला परिसरात भूस्खलन झाल्याने श्रीनगर-लेह हायवे बंद करण्यात आला होता. रियासीमध्ये झाड कोसळून तीन कुटुंबांमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार चिमुरड्यांचा समावेश आहे. तसेच पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी दोन जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. याच जिल्ह्यातील बीएसएफचे बंकरही वाहून गेले आहे. त्यात इन्सपेक्टर मोहम्मद रशीद जखमी झाला. येथे काही शस्त्रे वाहून गेल्याचेही वृत्त आहे.
35 कुटुंबांना वाचवलेपोलिस आणि लष्कराच्या जवानांनी 35 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. काश्मीरमध्ये झेलम नदीच्या काठावर राहाणार्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना तातडीने घरे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येथे पावसाच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुलगाम, बडगाम, गांदरबल, अनंतनागसह अनेक परिसरांमध्ये पुरात फसलेल्या नागरिकांना मोहीम राबवून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
(फोटोः जम्मू-कश्मीरमधील पुरग्रस्ताना सुरक्षितस्थळी पोहोचवताना लष्कर आणि बचाव दलाचे जवान)