शिलाँग - मेघालय, आसाममधील पुरात आतापर्यंत ६८ जणांचे प्राण गेले आहेत. पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत मेघालयात ३८, तर आसाममध्ये ३० जणांचा मृत्यू झाला.
गेल्या तीन दिवसांत आसाम आणि मेघालयाला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे आलेल्या पुराने दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मेघालयात गेल्या चोवीस तासांत ३० जणांचा मृत्यू तर नऊ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. गारो हिल्स जिल्ह्यातील दुर्घटनांत २६ जण ठार झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४० तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. या निवा-यांत सुमारे ३० हजार नागरिकांना हलवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आसाममधील बालबोरा आणि कृष्णाई भागात आतापर्यंत सहा मृतदेह सापडले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. शेजारचा जिल्हा कामरूपमध्ये ८ मृतदेह आढळून आले. गोलपाडा जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी ९४ निवारे उभारण्यात आले आहेत. त्यात सुमारे ९० हजार नागरिकांना हलवण्यात आले आहे.
* आसाममध्ये ९० हजार नागरिक हलवले
राजनाथ यांच्याकडून विचारपूस
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी बुधवारी चर्चा केली. त्यात त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील पूरस्थिती अत्यंत भीषण असल्याचे गोगोई यांनी सांगितले. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले.
घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना मदत
आसाम सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. गोगोई सरकारकडून ही घोषणा झाली.
काश्मीरमध्ये परीक्षा रद्द
काश्मीरमध्ये तंत्रज्ञानासंबंधीची राष्ट्रीय परीक्षा रद्द करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. परीक्षा लांबली आहे.