बंगळुरू - प्रसारमाध्यमे टीआरपी रेटिंग मिळवण्यासाठी लैंगिक अत्याचाराच्या घटनांना प्रसिद्धी देत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. जॉर्ज मंत्री म्हणून बेजबाबदार असून त्यांना काम करता येत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
माध्यमांवर आरोप करून जॉर्ज स्वत:ची निष्क्रियता झाकत आहेत. माध्यमांमुळेच अशा घटना समोर येत असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी.एस.येदीयुरप्पा यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वादातून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मला हा प्रकार माहीत नाही. जॉर्ज यांच्याशी या विषयावर बोलू. कशाच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले हे मला माहीत नसल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जॉर्ज यांनी बुधवारी प्रसारमाध्यमे टीआरपी मिळवण्यासाठी बंगळुरूला रेप सिटी म्हणून प्रोजेक्ट करत असल्याचा आरोप केला.