आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये 10,000 वर मृत्यू, विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 हजारांपेक्षा अधिक असल्याची भीती विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांनी शनिवारी व्यक्त केली. राज्य सरकारने आतापर्यंत 1 हजारावर मृत्यू झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मृतांचा आकडा 900 असल्याचे मुंबईत बोलताना सांगितले. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे मृतांच्या निश्चित संख्येबाबत संभ्रम वाढला आहे. अलमोरामध्ये कुंजवाल म्हणाले, महापुरात चार ते पाच हजार लोकांचा मृत्यू झाला असावा असे वाटत होते, परंतु प्रत्यक्ष या भागाचा दौरा केल्यानंतर ही हानी भयंकर असल्याचे दिसते. लोकांनी जी माहिती दिली त्याचा अंदाज काढला तर दहा हजारावर लोकांचा मृत्यू झाला आहे.’
राज्याचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मात्र कुंजवाल यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, असे ते म्हणाले. जोवर सर्व मृतदेह ढिगार्‍यांखालून काढले जात नाहीत तोवर मृतांच्या संख्येबाबत काहीही ठोस सांगता येणार नाही, असे बहुगुणा म्हणाले.
खराब हवामानामुळे बद्रीनाथमधील थांबवण्यात आलेल्या बचाव कार्याला शनिवारी नव्या जोमाने सुरुवात झाली. दुपारपर्यंत 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. दुसरीकडे पूरग्रस्त भागात 2 हजार 379 मेट्रिक टन गहू व 2 हजार 875 मेट्रिक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे.
बचाव मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बद्रीनाथ भागात सुमारे 1400 नागरिक अडकून पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सायंकाळपर्यंत येथील मोहीम थांबवण्यात येणार आहे. रुद्रप्रयाग, चामोली, उत्तरकाशी जिल्ह्यात पुरामुळे अत्यावश्यक मदत साहित्य पोहोचवण्याचे काम थांबवण्यात आले होते, परंतु लवकरच तीन जिल्ह्यांतील सुमारे 600 गावांना हे साहित्य पुरवण्यात येणार आहे.
दोन दिवसांत संख्या कळेल
बेपत्ता लोकांची अचूक संख्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे उत्तराखंडचे मुख्य सचिव सुभाषकुमार यांनी म्हटले. एकच नाव दोन वेळा असू शकते. त्याची शहानिशा केली जात असल्याचे कुमार म्हणाले.

रामबाडा आणि गौरीकुंडमध्ये अजूनही सुमारे अडीच हजार मृतदेह विखरून पडले असल्याचे वृत्त आहे. या मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण आहे. शिवाय, अजून साडेचार हजार लोकांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे कुटुंबीय पूरग्रस्त भागातील कानाकोपर्‍यात आप्तांचा शोध घेत आहेत.


केदारनाथमध्ये अंत्यसंस्कार : केदारनाथमध्ये रोगराईचा धोका टाळण्यासाठी मृतदेहांवर तातडीने सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

रस्त्यांची दुर्दशा
नैसर्गिक संकटानंतर उत्तराखंडमधील रस्त्यांची सर्वाधिक दुर्दशा झाली आहे. तेहरी भागातील 259 रस्ते खराब झाले आहेत. डेहराडूनमधील 139, उत्तरकाशीतील 132, चामोली 110, रुद्रप्रयाग जिल्ह्यात 71 रस्ते वाहून गेले आहेत.
केदारनाथ मंदिराचा आढावा
केदारनाथ मंदिराच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाची टीम लवकरच उत्तराखंडमध्ये दाखल होणार आहे. पाच
जणांची ही टीम असेल. त्यात डेहराडून व दिल्लीच्या तज्ज्ञांचा समावेश असेल. पुरातत्त्व विभागाकडून केदारनाथ मंदिर संरक्षित स्थळ नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
हिमाचल प्रदेशमध्ये रोगराईचा धोका

० गढवालमधील श्रीनगर भागात ढिगारे आणि गाळामुळे रोगराईचा धोका वाढला.
० महापुरामुळे या भागात सुमारे 100 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.
० एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये अडीच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचा दावा.