बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर विधानपरिषदेच्या जागेसाठी 20 कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक ऑडिओ सीडी रिलीज करुन हा आरोप करण्यात आला आहे. या सीडीत कथितरित्या कुमारस्वामी विधानपरिदषेच्या एका जागेसाठी लाच मागत आहेत. जून महिन्याच्या प्रारंभीची ही चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. विधानपरिषदेसाठीचा हा घोडेबाजार समोर आल्यानंतर कर्नाटकचे राजकीय वातावरण तापले आहे.
कुमारस्वामींनी मागितली लाच ?
वीजूगौडा पाटील अभिमंगल बलागा (वीजूगौडा पाटील मित्रमंडळ) यांनी ही ऑडिओ सीडी रिलीज केली आहे. त्यांनी दावा केला आहे, की कर्नाटक विधान परिषदेच्या सदस्यत्वाचे दावेदार वीजापूरचे वीजूगौडा पाटील यांचे एक समर्थक आणि कुमारस्वामी यांच्यातील ही चर्चा आहे. कुमारस्वामी पाटील यांच्या समर्थकांना म्हणतात, 'माझे आमदार पैशांसाठी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या सांगण्यावरुन काँग्रेसच्या उमेदवारालाही समर्थन देऊ शकतात. ते आता माझेही एकत नाहीत. सर्वांनी निवडणुकीसाठी कर्ज काढले आहे आणि त्यांना आता त्याची भरपाई हवी आहे. सर्व 40 आमदार प्रत्येकी एक - एक कोटींची मागणी करत आहेत.' कुमारस्वामी यांच्या या बोलण्यावर वीजूगौडा पाटील समर्थक 40 कोटींची ऑफर देतात. त्यावर कुमारस्वामी म्हणतात, तुम्ही 20 कोटी रुपये द्या बाकीचे मी पाहून घेतो.
कुमारस्वामींनी केला बचाव
विधानपरिषद निवडणुकीच्या जागेसाठी पैसे मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर कुमारस्वामी यांनी तुम्ही मला पैसे घेताना पाहिले का? असा सवाल केला आहे. ते म्हणाले, सीडीमध्ये फक्त पैशांचा उल्लेख केल्याचे आहे. कोणी मला पैसे घेताना पाहिले का? पैशांच्या बदल्यात जागा हे सध्याच्या राजकारणातील कडवे सत्य असल्याचेही ते म्हणाले.