आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालमध्ये आज चौथा टप्पा, कडेकोट सुरक्षा; तृणमूल मंत्र्यांचे ठरेल भविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

उत्तरेकडील २४ तालुक्यातील ४९ मतदारासंघांचा यात समावेश आहे. मतदान प्रक्रियेत १.८ कोटी मतदार आपला हक्क बजावतील. प्रदेशात १२ हजार ५०० मतदान केंद्र उभारण्यात आले अाहेत. अमित मित्रा, पुरेंदू बासू, चंद्रिमा भट्टाचार्य, ब्रात्या बासू, ज्योतिप्रियो मुलिक अरूप रॉय हे तृणमूल काँग्रेसचे मंत्री आपले भाग्य आजमावणार आहेत. चौथ्या टप्प्यात ३४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी केवळ ४० महिला उमेदवारांचा समावेश आहे. ४९ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सुमारे ९० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ६७२ तुकड्या तसेच २२ हजार पोलिसही तैनात करण्यात आले. चौथ्या टप्प्यात सर्वांचा नजरा विद्यमान क्रीडा मंत्री मदन मित्रा यांच्या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. कामारहाती मतदासंघातून ते निवडणूक लढवत आहेत. वास्तविक मदन मित्रा यांना डिसेंबर २०१४ मध्ये सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. शारदा चिटफंड घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. हायप्रोफाइल उमेदवाराने तुरुंगातून निवडणूक लढवण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रा यांचा प्रचार केला होता. केंद्र सरकारच्या कटाचे बळी असल्याचा आरोप ममतांनी करून मित्रा यांचे समर्थन केले होते. त्यामुळेच जनता त्यांना कौल देते का, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. मित्रा २०११ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी फिक्कीचे सरचिटणीस पदाची जबाबदारीही सांभाळली होती.

हिंसाचारामुळे अधिक खबरदारी: पश्चिमबंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान माकपच्या एका स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला होता. मतदान केंद्राजवळ झालेल्या बाँबस्फोटात ते मारले गेले होते. निवडणुकीला गालबोट लागले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिस उच्चाधिकारी उत्तर २४ परगण्यात ठाण मांडून बसणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर ते पूर्ण देखरेख ठेवतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

रविवारी तृणमूलच्या रोड शोमध्ये काही उत्साही मतदारांनी रविवारी ममतांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

दालमियांची मुलगी
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली, बंगाल क्रिकेट कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला हे दोघेही तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. शुक्ला यांच्यासमोर भाजपच्या नेत्या तथा अभिनेत्री रूपा गांगुली यांचे आव्हान आहे. फुटबाॅलपटू दीपेंदू बिश्वास देखील सत्ताधारी पक्षाकडून लढवत आहेत.