श्रीनगर - श्रीनगरसह काश्मीर खोर्यातील बहुतांश भागात रविवारी पुन्हा जोरदार बर्फवर्षाव झाला. पुढील दोन-तीन दिवस असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
चाळीस दिवसांचा अत्यंत थंडीचा काळ "चिल्लाई-कलां'च्या एका दिवसानंतर झालेल्या या बर्फवृष्टीने पुन्हा कडाक्याची थंडी परतली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त रोहित कंसल यांनी सांगितले की, खोर्यात पुढील ४८ तासांत जोरदार हिमवर्षावाचा अंदाज आहे.
प्रशासन कोणत्याही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. प्रचंड हिमवर्षावामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था केली जात आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद पडू नये याला प्राधान्य दिले जात आहे. रुग्णालये, वीज केंद्र आणि पाणीपुरवठा करणार्या योजनांपर्यंत जाणार्या रस्त्यांच्या स्वच्छतेलाही महत्त्व दिले जात आहे.