आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीला गवसले धागे; कर्नाटकचे गृहमंत्री रेड्डी यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) काही संकेत मिळाले असून पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी सोमवारी केला.  

चिक्कबल्लपुरा येथे पत्रकारांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, ‘आम्हाला काही संकेत मिळाले आहेत. पण सध्या त्याबाबत माध्यमांना काही सांगू शकत नाही. कारण त्यासाठी आमच्याकडे भक्कम पुरावे हवेत. योग्य पुरावा नसताना न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यास केस उभी राहणार नाही. त्यामुळे आम्ही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची एसआयटी त्या दिशेने काम करत आहे.’ या प्रकरणात एसआयटीला काही संकेत मिळाले आहेत, असे वक्तव्य रेड्डी यांनी ९ सप्टेंबरलाही केले होते. गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.  

प्रस्थापितांच्या विरोधात लेखन करणाऱ्या पत्रकार अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने पोलिस महानिरीक्षक (गुप्तचर विभाग) बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती. हत्या प्रकरणाबद्दल माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीसही सरकारने जाहीर केले होते.  

गौरी लंकेश यांच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले होते. गौरी यांच्या हत्येत उजव्या विचारसरणीच्या संशयिताचा सहभाग असावा, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच नक्षलवाद्यांचाही हात असू शकतो, असे मतही व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे हत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणीही त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती.
बातम्या आणखी आहेत...