आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gauri Lankesh Murder Cm Compair Kalburgi Pansare Dabholkar Case News And Updates

गौरी लंकेश मर्डर: राजनाथ सिंहांनी कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला, देशभरात निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्नाटमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. - Divya Marathi
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्नाटमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत.
बंगळुरु - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी राजनाथ सिंह यांनी कर्नाटक गृह सचिवांकडून अहवाल मागवला आहे. हत्येनंतर बंगळुरुमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. राज्यासह देशभरात या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने होत आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी गौरी यांच्या हत्येची तुलना कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्येशी केला आहे. मंगळवारी राजराजेश्वरी नगर येथील राहात्या घरी गौरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश या कन्नड साप्ताहिक 'लंकेश पत्रिके'च्या संपादक होत्या. 
 
लेखकांना संरक्षण देण्याच्या सूचना 
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी गौरी लंकेश हत्येवर म्हटले आहे, की अद्याप हल्लेखोरांची लिंक लागलेली नाही. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पुरोगामी विचारांच्या लेखकांना सुरक्षा प्रदान करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहे. 
- सिद्धारमैया म्हणाले, काही दिवसांपूर्वीच गौरी यांची भेट झाली होती. मात्र त्यांनी असा हल्ला होऊ शकतो, याचा काही उल्लेख केला नव्हता. किंवा त्यांना धमक्या आल्या असेही म्हटल्या नव्हत्या. 
- दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, दोन जणांनी त्यांच्याबद्दल फेसबुकवर काही पोस्ट केल्या होत्या. त्यांची चौकशी सुरु आहे. मात्र हत्येमागे कोण आहे हे लागलीच सांगता येऊ शकत नाही. 
- गौरी लंकेश हत्येचा तपास सीबीआयला देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, हे डीजीपीवर सोडले पाहिजे. याबद्दल ते गृहमंत्र्यांशी बोलतील. 
 
हत्येआधी गौरी यांनी केले होते दोन ट्विट 
- गौरी लंकेश यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते, 'आपण काही खोट्या पोस्ट शेअर करण्याची चूक करतो. चला निश्चय करुया आणि एकमेकांना उघडं पाडण्याचे प्रयत्न बंद करुया'
- दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते, 'मला असे का वाटत आहे की आपण आपल्यातच भांडत आहोत. आम्हाला सगळ्यांना माहित आहे आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे. कृपया आपण त्यावर लक्ष देऊ शकतो का.'
 
सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही - राहुल गांधी 
गौरी लंकेश यांच्या हत्येचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, 'सत्याचा आवाज कधीच दाबले जाऊ शकत नाही. मात्र दुर्दैव हे आहे की संघ आणि भाजप विचारधारेकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत आहे. हा भारत देश आहे, येथे सत्य कधीच दडपले जाऊ शकत नाही. भले कितीही लोकांना तुम्ही ठार मारा.'
गौरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत राहुल म्हणाले, 'केवळ काँग्रेसच नाही, संपूर्ण देश लंकेश यांच्या कुटुंबियांच्यासोबत आहे.' 

देशभरात निदर्शने 
- पुरोगामी विचारांच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध होत आहे. ट्विटर, फेसबुकसह सोशल मीडियावर हत्येच्या निषेधार्थ तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 
- कर्नाटकात गौरी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने सुरु आहेत. त्याच बरोबर देशभरातही डाव्या आणि पुरोगामीविचारांच्या कार्यकर्त्यांकडून हत्येचा निषेध व्यक्त होत आहे. 
- महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजता निदर्शने करण्यात येणार आहे तर, नागपूरमधील संविधान चौकात बुधवारी सायंकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
बंगळुरुचे पोलिस आयुक्त टी. सुनीलकुमार म्हणाले, गौरी यांनी कधी हत्येची धमकी मिळाल्याची तक्रार केली नव्हती. त्यांनी जर कुठे धमकीचा उल्लेख केला असेल तर त्याचा तपास केला जाईल. 
 - पोलिस आयुक्त म्हणाले, काहींनी त्यांच्या घरासमोरुन बंदुकीचा आवाज ऐकला आणि त्यांना घरात जाण्याआधी पडताना पाहिले होते. हल्लेखोर किती होते हे अजून समजू शकलेले नाही. 
 - सुनीलकुमार म्हणाले, आम्ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा गौरी लंकेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तिथे गोळ्यांचे चार रिकामे शेल पडलेले सापडले. 
 
भाजप नेत्यांनी केली होती केस 
 - गौरी लंकेश (55) या उजव्या विचारधारेवर आसूड ओढत होत्या. अब्रुनुकसानीच्या खटल्यात त्यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. तेव्हा त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. 
 - धारवाडचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे नेते उमेश दुशी यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. 
 - 2008 मध्ये गौरी यांच्या लंकेश पत्रिकेत एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्यात भाजप नेत्यांचा उल्लेख होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.  
 
दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचीही अशीच हत्या
 - महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात सकाळी मॉर्निंगवॉकला निघाले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 
 - त्यानंतर 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे लेखक आणि डाव्या विचारांचे नेते अॅड. गोविंद पानसरे यांचाही खून गोळ्या झाडून करण्यात आला होता. त्यांना त्यांच्या घरासमोरच गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. 
 -  डॉ. एम.एम. कलबुर्गी यांनाही त्यांच्या घरासमोरच गोळ्या मारुन ठार करण्यात आले होते. 
 
वडील चित्रपट निर्माते 
 - गौरी यांचे वडील पी. लंकेश विख्यात चित्रपट निर्माते होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी 1980 मध्ये लंकेश पत्रिका सुरु केले होते. 
 - गौरी यांच्या पश्चात बहिण कविता, भाऊ इंद्रेश आणि आई आहे. कविता या देखील चित्रपट निर्मिती करतात. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...