आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री बाळाला जन्म अन पहाटेच दिली पदवी परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद - नुकतीच वयाची २१ वर्षे पूर्ण करणारी रिंकी. पोटात नऊ महिन्यांचा गर्भ असूनही मनात शिकण्याची जिद्द कायम. मध्यरात्री २ वाजता रिंकीने गाेंडस बालिकेला जन्म दिला आणि त्यानंतर ८ तासांतच परीक्षा देऊन नवा आदर्श घडवला. धनबादची कन्या रिंकी बी.कॉम. ऑनर्स अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असून ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. मात्र, याच महिन्यात तिची परीक्षाही आली. अशातच ३ मे च्या रात्री तिला प्रसववेदना होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करून तिच्या बाळाला जन्म देण्यात आला.

बुधवारी सकाळी रिंकूचा तिसरा पेपर होता. शस्त्रक्रियेच्या २ तासांनी ती शुद्धीवर आली आणि डॉक्टरांना परीक्षा देण्यास जाऊ देण्याची परवानगी मागू लागली. डॉक्टरांनी तर नकार दिलाच मात्र कुटुंबीयसुद्धा तिची मनधरणी करू लागले. मात्र, जिद्दी रिंकूसमोर अखेर सर्वांनाच नमते घ्यावे लागले. तिला रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रावर नेण्यात आले. परीक्षा केंद्रातही

तिला इंजेक्शन देणे सुरूच होते. मात्र, तिचा ध्यास कायम होता. हा सर्व अनुभव रिंकीने भास्करकडे विशद केला...

मुलगी मोठी झाल्यावर तिला या तीन तासांच्या संघर्षाची कहाणी नक्की सांगेन
मे महिना माझ्यासाठी आनंदाचा असेल हे मला आधीच माहिती होते. कारण डॉक्टरांनी बाळंतपणाची तारीख आधीच सांगितली होती. पहिल्यांदा आई बनण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कुटुंबीयांनाही या क्षणाचीच वाट होती. दुसरीकडे, माझे बी.कॉमचे शेवटचे वर्ष. वर्षभराचा अभ्यास अगदी शेवटच्या टप्प्यात होता. मात्र, परीक्षेसोबत बाळंतपणाची तारीखही जवळ येत होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मी दोन पेपर दिले. "आधी बाळाला नीट जन्म दे, शिक्षण पुढेही सुरू राहील,' असा कुटुंबीयांचा सल्ला होता.

परंतु मला वर्ष वाया घालवायचे नव्हते. ४ मे रोजी पेपर होता आणि ३ मेला प्रसववेदना सुरू झाल्या. मंगळवारी रात्री २ वाजता कन्यारत्न जन्माला आले. शुद्धीवर आले तर नातेवाइकांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती. परंतु मला परीक्षा द्यायची होती. डॉक्टरांना मी खूप विनवणी केली. कुटुंबीय प्रचंड नाराज होते. शेवटी डॉक्टरांनी माझ्यासमोर नमते घेतले आणि परवानगी दिली. एका रुग्णवाहिकेत नर्ससोबत परीक्षा केंद्रावर पोहोचले. एकीकडे नर्स इंजेक्शन देत होती अन् दुसरीकडे मी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात मग्न होते. परीक्षेचे हे तीन तास मला आयुष्यभर लक्षात राहतील. जेव्हा माझी मुलगी मोठी होईल. तेव्हा या तीन तासांचा संघर्ष मी तिला नक्की सांगेन.
बातम्या आणखी आहेत...