श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे फुटीरतावाजी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी पासरोप्ट मिळवण्यासाठी स्वतः भारतीय असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलेल्या गिलानी यांनी सर्व बायोमॅट्रिक चाचण्या पूर्ण केल्या. मात्र, त्यानंतर माध्यमांबरोबर बोलताना त्यांनी
आपण नाइलाजास्तव भारतीय असल्याचे मान्य केले असे म्हटले आहे.
सारे काही पासपोर्टसाठी ..
रीजनल पासपोर्ट ऑफिसरच्या मते शुक्रवारी गिलानी यांनी त्यांचा बायोमॅट्रिक डाटा सबमिट केला. फिंगर प्रिंट आणि डोळ्यांची ओळख यांचा डाटाही दिला. 88 वर्षांचे फुटीरतावादी नेते गिलानी यांना मुलीला भेटण्यासाठी सौदी अरबला जायचे आहे. त्यासाठी त्यांना पासपोर्टची आवश्यकता आहे. गिलानी यांना औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10.15 वाजेची वेळ देण्यात आली होती. त्याचवेळी ते पोहोचले.
काय म्हणाले गिलानी
पासपोर्ट ऑफिसबाहेर माध्यमांशी बोलताना गिलानी म्हणाले की, मी जन्माने भारतीय नाही पण सध्या स्वतःला भारतीय म्हणणे हा आपला नाइलाज आहे. हुर्रियतच्या एका प्रवक्त्यांनीही गिलानी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. नागरिकत्वाच्या रकाण्यात भारतीय लिहिणे हा काश्मिरींचा नाइलाज आहे. कारण त्यांना प्रवास याच पारपोर्टवर करावा लागतो, असे ते म्हणाले.
पासपोर्टवरून झाला होता वाद...
गिलानी यांना पासपोर्ट देण्याच्या मुद्यावरून गेल्या महिन्यातच राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्याचे कारण म्हणजे भाजपने त्यांना पासपोर्ट देण्यास विरोध केला होता. त्यांनी आधी आपले राष्ट्रीयत्व भारतीय घोषित करावे अशी भाजपची मागणी होती. एवढेच नाही तर भाजप आणि शिवसेनेच्या वतीने गिलानी यांनी भारतविरोधी कारवायांसाठी माफी मागायला हवी असेही भाजप, शिवसेनेने म्हटले होते. पीडीपीनेही या मुद्यावर भाजपला पाठिंबा दिला होता. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र याविषयी कसलीही तक्रार नसल्याचे म्हटले होते. गिलानी यांना आधीही पासपोर्ट देण्यात आला होता, असे अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान, गिलानी यांच्या पासपोर्टच्या मुद्यावर गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा अर्ज अपूर्ण असल्याने त्यावर विचार करता येणार नसल्याचे म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनीही गिलानींचा अर्ज अपूर्ण होता आणि शुल्क मिळाले नव्हते तसेच बायोमॅट्रिक डीटेल्स आणि फोटो दिलेले नव्हते असे म्हणाले.