आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूला दररोज ६ हजार क्युसेक पाणी द्या : सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सालेम - कावेरी पाणीप्रश्नी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला नवा आदेश दिला आहे. कर्नाटकने तामिळनाडूला २७ सप्टेंबरपर्यंत दररोज ६ हजार क्युसेक पाणी द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर कावेरी देखरेख समितीच्या आदेशाला आव्हान देण्याची मुभा दोन्ही राज्यांना असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना ५ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला कावेरी धरणातून प्रतिदिवशी १५ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. १० दिवसांपर्यंत हे पाणी तामिळनाडूला द्यावे असे या निर्णयात म्हटले होते. नंतर या निर्णयात बदल करत २० सप्टेंबरपर्यंत दररोज १२ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. कावेरी पर्यवेक्षण समितीने सोमवारी घेतलेल्या बैठकीत कर्नाटक सरकारला २१ ते ३० सप्टेंबरदरम्यान दर दिवशी ३००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आता दोन्ही राज्ये आव्हान देऊ शकणार आहेत. दुसरीकडे कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला मिळाल्यास मेट्टूर धरणाचा आेघ स्थिर ठेवणे शक्य होईल.
भात उत्पादकांसाठी ६४ कोटींची तरतूद
मुख्यमंत्री जयललितांनी ऑगस्टमध्ये सांबा भात उत्पादकांसाठी ६४ कोटींच्या विशेष योजनेची घोषणा केली होती. यात शेतकऱ्यांसाठी सबसिडी देण्यात आली. दर्जेदार बियाणे, यांत्रिक पद्धतीने पेरणी आदींसाठी या विशेष योजनेअंतर्गत सबसिडी देण्याची तरतूद आहे.

मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडले, भातशेतीला दिलासा
तामिळनाडू सरकारने मंगळवारी मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडले असून सांबा (भात) पिकाला त्यामुळे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. या त्रिभुज प्रदेशातील शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला. १२ लाख एकर शेतजमिनीला याद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. एआयएडीएमकेचे ज्येष्ठ मंत्री इडाप्पाडी के. पालनीस्वामी आणि पी. थांगमणी यांच्या उपस्थितीत मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातीला २००० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून सायंकाळपर्यंत १२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येईल, असे पालनीस्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरवर्षी धरणातून १२ जूनपासून पाणी सोडण्यात येते. मात्र यंदा पाण्याची पातळी कमी असल्याने उशिरा पाणी सोडण्यात आले.१६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सांबा शेतीसाठी मेट्टूरचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. जलाशयाची पातळी ८४.७६ फुटांपर्यंत असून कर्नाटकातून पाणीपुरवठा होण्याची स्थिती असल्याचे जयललिता म्हणाल्या. त्याआधारे मेट्टूरचे पाणी शेतीला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मुुख्यमंत्र्यांनी सांगितले.
छायाचित्र: कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था.
बातम्या आणखी आहेत...