आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Tit For Tat Fight To Pakistan, Divya Marathi

भारतीयांच्या जिवावर उठलेल्या पाकला चोख प्रत्युत्तर द्या; लष्कराला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पाकिस्तानी जवानांनी रविवारी रात्री केलेल्या तुफान गोळीबारात घराबाहेर झोपलेले एकाच कुटुंबातील चार नागरिक मृत्युमुखी पडले.
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीयांच्या जिवावर उठलेल्या पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आदेश भारतीय लष्करास देण्यात आले असून जवानांना "जशास तसे' उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे सीमेवर तणाव वाढला असून सीमा सुरक्षा दलाचे उपमहासंचालक डी. के. पाठक जम्मूत आले आहेत.

संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही भारतीय जवान पाकच्या गोळीबारास चोख प्रत्युत्तर देत असल्याचे म्हटले आहे. तर, पाकने युद्धबंदी मोडून चालवलेला गोळीबार थांबवावा. भारतात परिस्थिती आता बदलली आहे याचे भान पाकने ठेवावे, असे आव्हान गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला दिले.

विधानसभा निवडणूक लक्ष्य : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे. या वेळी अशा कारवाया करून आडकाठी आणण्याचा पाकचा डाव आहे. काश्मीर खो-यात घुसखोरांचा आता खात्मा झाल्यानंतर जास्तीत जास्त घुसखोर भारतात घुसवण्याचा पाकचा कट असून यासाठी वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे.

ईदची मिठाई पाकने परत पाठवली : बकरी ईदच्या निमित्ताने भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाठवलेली मिठाई पाक सैनिकांनी परत पाठवली. अतारी सीमेवर ही मिठाई पाठवण्यात आली होती. यापूर्वी ईदनिमित्त भारतीय लष्कराने अनेकदा पाक सैनिकांना भेटवस्तू पाठवल्या आहेत. मात्र यंदा तणाव अधिकच वाढला आहे.

सहा दिवसांत अकरावे उल्लंघन
* पूंछमध्ये सात वेळा तर जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर चार वेळा पाकने युद्धबंदीचे उल्लंघन केले.
* १ व २ ऑक्टोबर रोजी पूंछ जिल्ह्यात दोन वेळा युद्धबंदी मोडली. तेव्हा तीन महिलांसह सहा जण जखमी झाले होते.
* ३ ऑक्टोबरला पाक सैनिकांनी गुलमर्ग सेक्टर, पूंछ तसेच जम्मू सेक्टरमध्ये युद्धबंदी मोडली. यात १२ वर्षांची एक मुलगी ठार तर काही लोक जखमी झाले होते.
* ४ ऑक्टोबरला पाक सैनिकांनी पूंछ जिल्ह्यात ताबा रेषेलगत निवासी वस्त्यांवर प्रचंड गोळीबार केला होता. सुदैवाने यात जीवित हानी झाली नव्हती.
* ५ ऑक्टोबरला ताबा रेषेवर, पूंछ जिल्ह्यातील बालनोई सबसेक्टरमध्ये पुन्हा भारतीय चौक्यांवर तुफान गोळीबार करण्यात आला होता.

ऑगस्टमध्येही होता प्रचंड तणाव
गेल्या २६ ऑगस्ट रोजी सीमेवर पाकने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. हा तणाव कमी करण्यासाठी २९ ऑगस्टला सीमेवर ऑक्ट्रॉय चौकीत कमांडरस्तरीय फ्लॅग मीटिंगही झाली होती.