आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • GJM Leader Arrested, Bandh In Darjeeling Enters Ninth Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोरखा जनमुक्ती मोर्चाची अडेलतट्टू भूमिका, नवव्या दिवशीही दार्जिलिंग ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दार्जिलिंग - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली डेडलाइन धुडकावून लावणार्‍या गोरखा जनमुक्ती मोर्चाने आपली अडेलतट्टू भूमिका सुरूच ठेवली आहे. संघटनेच्या बंदमुळे रविवारी नवव्या दिवशीही दार्जिलिंगमधील जनजीवन ठप्प होते. दुसरीकडे संघटनेने गोरखालँडच्या प्रश्नी राज्याशी नव्हे तर केवळ केंद्र सरकारशीच चर्चा करू, असे तरकट लावल्याने जनता वेठीस धरली जात आहे. तर अखंड आध्र प्रदेशसाठीही तेलंगणात उग्र आंदोलन सुरुच आहे.

पश्चिम बंगालमधून गोरखालँडला वेगळे करण्याची आमची मागणी आहे. ही मागणी घेऊन आम्ही राज्य सरकारकडे जाणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नी लुडबुड करू नये, असे गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरूंग यांनी स्पष्ट केले आहे. ते रविवारी पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनची खिल्ली उडवताना गुरूंग म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी बंद मागे घेण्यासाठी आम्हाला 72 तासांची मुदत दिली आहे. हा कालावधी संपल्यानंतर मात्र लोक स्वत: हून घराबाहेर पडणार नाहीत. लोक घरातच राहतील. दरम्यान, जीजेएमच्या कार्यकारी समितीचे सदस्य शेखर शर्मा यांच्या राज्य सरकारने काही जुन्या प्रकरणात अटकेची कारवाई केली. शनिवारी रात्री त्यांना अटक झाली. त्या पाठोपाठ जीजेएमच्या चार नेत्यांनाही रविवारी अटक झाली. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या 172 वर पोहोचली आहे. दरम्यान, जीजेएमचे नेते आणि समर्थक रविवारी गोरखालँडच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून काही भागात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले. सरकारच्या सूचनेनंतर राज्यात प्रदेशातील बंदचे टीव्ही वृत्तांकन थांबवण्यात आले होते.

बिनबुडाचा आरोप
केंद्र सरकार आणि जीजेएम संघटनेत एक गुप्त सौदा झाला आहे. त्यानुसार केंद्र सरकार संघटनेची मागणी पूर्ण करणार आहे. परंतु या डोंगराळ प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येणार आहे, असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, हा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा गुरूंग यांनी केला.

बंद एक दिवस शिथिल
दार्जिलिंगसह परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून बंद पाळण्यात येत आहे. आंदोलन सुरूच राहणार आहे. परंतु त्यात एक दिवसाचा अवकाश देण्यात येणार असल्याचे जीजेएमकडून रविवारी जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी हा बंद एक दिवस मागे घेतला जाणार आहे.

दार्जिलिंगच्या चहा उद्योगाला टाळे
स्वतंत्र गुरखालँडच्या मागणीचा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये सलग नवव्या दिवशीदेखील गुरखा जनमुक्ती मोर्चाने ताणून धरला. रविवारी दार्जिलिंगमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने चहा उद्योगाचे उत्पादन जवळपास बंद झाल्याचे पाहायला मिळाले. काही कारखान्यांना टाळेही लागले आहे. सर्वाधिक फटका याच क्षेत्राला बसला आहे. ऑगस्ट महिन्यातील दुसरा हंगाम महत्त्वाचा आहे. या काळात 7. 35 लाख किलोग्रॅम एवढे चहा उत्पादन अपेक्षित असतानाही ते प्रत्यक्षात शक्य दिसत नाही. मालवाहतूक करणारी यंत्रणाच बंदमुळे कोलमडून पडली आहे.