आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने तस्कराने दिला राष्ट्रपती भवनाचा पत्ता, आयकार्ड दाखवून पोलिसांवर दाखवायचा रुबाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - डीआरआरआयच्या ताब्यात असलेल्या सोने तस्कर मोहंमद नजीमने कागदोपत्री त्याचा राहण्याचा पत्ता राष्ट्रपती भवन परिसरातील प्रेसिडेंट इस्टेट असा दाखवला आहे. त्याच्याकडे सापडलेले आधार कार्ड व अॅड्रेस प्रूफवरही हाच पत्ता असून तुरुंग प्रशासनालाही त्याने हाच पत्ता सांगितला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेकडून नजीमच्या कागदपत्रांची तसेच त्याच्या प्रेसिडेंट इस्टेटच्या संबंधांची छाननी केली जात आहे.

राष्ट्रपती भवन परिसरातील प्रेसिडेंट इस्टेटमध्ये राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक व खासगी स्टाफ राहतो. त्यामुळे हा परिसरदेखील व्हीआयपी कक्षेतच मोडतो. मोहंमद नजीम याने गेल्या काही दिवसांत दुबईहून २.५ कोटी रुपये किमतीचे ९ किलो सोने घेऊन आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मोहंमद नजीमला जयपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. त्या वेळी त्याने त्याचा पत्ता पॉकेट -१, क्वार्टर नंबर -१७, शेड्यूल ए, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली असा दाखवला आहे. त्याच्याकडे मिळालेल्या आधार कार्डवरही हाच पत्ता आहे. हे क्वार्टर नजीमचा भाऊ मोहंमद साजिद याच्या नावाने राखीव आहे.

हैदराबाद येथील डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की, नजीम काही िदवसांपूर्वी दुबईला गेला होता. तेथून त्याने अहमदाबादच्या फ्लाइटमधून २.५ कोटी रुपयांचे ९ किलो सोने आणले. हे सोने त्याने सीटच्या गादीखाली लपवून ठेवले होते. तो स्वत: अहमदाबादला उतरला व विमान नंतर मुंबईला रवाना झाले. तेथून ते दिल्लीला व नंतर हैदराबादच्या उड्डाणावर पाठवण्यात आले. दिल्ली- हैदराबाद उड्डाणानंतर हैदराबाद विमानतळावर सोने काढून घेण्याची तस्करांची योजना होती. त्याची कल्पना आल्याने डीआरआयने वेळीच कारवाई करून हैदराबादेत विमानातून सोने आधीच काढून घेतले. याप्रकरणी नजीमला अटक केली. याप्रकरणी त्याच्या भावाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

जयपूरमध्ये साडेपाच किलो सोन्यासह पकडले
जयपूर विमानतळावर बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्सनेे (डीआरआय) नजीम तसेच मोहंमद हरुण यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे ५.६ किलो सोने जप्त केले होते.
आयकार्ड दाखवून पोलिसांवर रुबाब, पीएचडीसाठीही अर्ज
नजीम हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने दिल्लीत त्याच्या भावाकडे राहून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तसेच त्याने पीएचडीसाठीही अर्ज केला होता. पीएचडी अर्धवट सोडून तो इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करायला लागला. त्याच्याआडून तो तगडी कमाई करण्यासाठी तस्करीकडे वळला. येथे बरीच वर्षे राहिल्याने त्याने इथलेच ओळखपत्र तयार करवून घेतले होते. त्याच आधारे त्याने आधार कार्डदेखील मिळवले. कुठे नाकेबंदी झाली, त्याला अडवले तर ओळखपत्र दाखवून तो पोलिसांवर रुबाब गाजवत असे.