श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये बहुधा आणखी काही दिवस राज्यपालांची राजवट राहील, असे दिसते. कारण मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार मेहबुबा मुफ्ती यांनी वडील मुफ्ती मोहंमद सईद यांच्या अंत्यविधीनंतरचे चार दिवस होईपर्यंत शपथ घेणार नसल्याचे बोलून दाखवले आहे.
मेहबुबा यांची नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तूर्त तरी तयारी नाही. चार दिवसांनंतर मात्र पदभार घेऊ शकतात, असे पीडीपीचे नेते मुजफ्फर हुसेन बेग यांनी सांगितले. दुसरीकडे मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा मुफ्ती यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यासाठी भाजपने बैठक बोलावली आहे. पीडीपी आणि भाजप यांच्या आघाडीचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये आहे. पीडीपीने गुरुवारीच राज्यपाल एन. एन. व्होरा यांना पत्र पाठवून आपले समर्थन कळवले होते. त्यात समर्थनाचा निर्णय झाल्यावर भाजप राज्यपालांकडे भूमिका कळवेल. त्यानंतर मेहबुबा यांच्या हाती राज्याची सूत्रे जातील.
मार्ग मोकळा होईल. राज्याच्या ८७ सदस्यीय विधानसभेत भाजप हा पीडीपीचा धाकटा भागीदार आहे. कारण भाजपकडे २५ सदस्य संख्या आहे.
मीडिया दूर
गुपकर भागातील मुफ्ती यांच्या निवासस्थानी शुक्रवारी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित शोकसभेला नेत्यांची हजेरी होती; परंतु प्रसारमाध्यमांना त्यापासून दूर ठेवण्यात आले होते. शनिवारीदेखील ही सभा हाेणार असल्याचे पीडीपीच्या सूत्रांनी सांगितले.
मुफ्ती यांच्यावर गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहेडा या मूळगावी अंत्यसंस्कार झाले. १५ दिवसांपूर्वी मुफ्ती यांना दिल्लीतील एआयआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुप्फुसाला गंभीर स्वरूपाचा जंतुसंसर्ग झाला होता. गुरुवारी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.