आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये शाळेची ग्रेड बँक, उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी घेऊ शकतात गुणांचे कर्ज, सव्याज करावी लागते परतफेड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- विद्यार्थ्यांवर परीक्षा व निकालाचा ताण कमी करण्यासाठी चीनच्या एका शाळेने अनोखा उपक्रम हाती घेतला. कोणीही विद्यार्थी नापास होऊ नये यासाठी शाळा त्यांना कर्ज स्वरूपात गुण देते. यानंतर विद्यार्थ्यांना कर्जाऊ गुण परतही करावे लागतात. त्यासाठी ग्रेड बँक स्थापन केली आहे. अन्य बँकांत जशी पैशाची देवाणघेवाण होते तसा इथे आकड्यांचा व्यवहार होतो. 
 
नान्जिंग नंबर - १ हायस्कूलने नोव्हेंबर २०१६ मध्ये याची सुरुवात केली. शाळेतील शिक्षिका मी हाँग यांनी बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, एखाद्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी ४ गुण कमी पडत असतील तर तो शिक्षकांशी बोलून ग्रेड बँकेतून ४ गुण कर्ज घेऊ शकतो. पुढील परीक्षेत त्याला हे ४ गुण बँकेला परत करावे लागतील. म्हणजे आगामी परीक्षेत त्याला ६४ गुण पडल्यास कर्जाचे, थोडक्यात ग्रेसचे ४ गुण त्यातून कमी होतील. यावर व्याज आकारणीचाही नियम आहे.

एखादा विद्यार्थी गुण परत करू शकला नाही तर? या प्रश्नावर मी हाँग म्हणाल्या, कर्जाच्या परतफेडीसाठी तीन संधी मिळतात. ते टप्प्याटप्प्यानेही परत करता येते. प्रयोगशाळेत अतिरिक्त वेळ काम करणे, अन्य उपक्रमांतून गुण परत केले जाऊ शकतात. यानंतरही विद्यार्थ्याला गुण परत करता आले नाही तर त्याला काळ्या यादीत टाकले जाते. त्यानंतर त्याला कर्जाऊ ग्रेस गुण दिले जात नाहीत.  शाळेचे संचालक केन हुआंग म्हणाले, विद्यार्थ्यांच्या विकासावर भर े हा आमचा उद्देश आहे. परीक्षा मुलांचे शिक्षण वृद्धिंगत होण्यासाठी असायला हव्यात. केवळ गुणांचा दबाव वाढवणारे ते शस्त्र ठरू नये. अनेकदा आजारपण, कौटुंबिक वातावरण आणि अन्य कारणांमुळे विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नाहीत. 

कधीकधी ते एक-दोन गुणांनी मागे राहतात. उदाहरणार्थ उत्तीर्ण होण्यासाठी ६० गुण हवे आहेत, मात्र ५९ पडले. फरक एकाच गुणाचा आहे, मात्र तोच निकालपत्रावर पास-नापासाचा शिक्का मारतो. यामुळे मुलांच्या मानिसक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. हे संपुष्टात आणण्यासाठी आम्ही ही प्रणाली आणली आहे.  

ग्रेड बँकेची ही प्रणाली पथदर्शी प्रकल्प म्हणून लागू आहे. आता केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच ती लागू आहे. यामध्ये ४९ विद्यार्थी आहेत. नोव्हेंबरपासून आतापर्यंत १३ विद्यार्थ्यांनी ग्रेड बँकेतून गुण प्राप्त केले आहेत. सात जणांनी सव्याज परत केले. शाळेने बँक व्यवसायात कार्यरत पालकांच्या मदतीने ही प्रणाली अंगीकारली आहे. 
बातम्या आणखी आहेत...