आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Disaster In Uttarakhand: Death Body Spread, But Not Wood For Funeral

उत्तरखंडमधील महाप्रलय: जागोजाग मृतदेहांचा खच, दहनाला लाकडे मिळेनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये 16 जूनला आलेला महापूर किती प्रलयंकारी होता याची साक्ष या भागात पडलेल्या मृतदेहांवरून मिळत आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गौरीकुंड तसेच आसपासच्या परिसरात हजारो मृतदेह विखुरले आहेत. वाळलेली लाकडे मिळत नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारांचाही प्रश्न आहे.


बचावकार्यातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवस उलटून गेल्याने आता या भागात पडलेले मृतदेह कुजत आहेत. जंगलालगत पडलेल्या मृतदेहांचे जनावरांनी लचके तोडले आहेत. एकट्या यमुनोत्रीमध्ये सुमारे 500 मृतदेह आहेत. स्थानिक प्रशासनाने अंत्यसंस्कारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु लाकडे मिळाली नाहीत. विध्वंस इतका आहे की परिसरातील 3700 गावेच नकाशावरून नष्ट झाली आहेत.


दरम्यान, सोमवारी 3 हजार 300 लोकांना दुर्गम भागांतून सुरक्षित हलवण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अजूनही 10 हजार लोक अडकून पडले असून पावसामुळे बचावकार्यात अडचणी वाढल्या आहेत. येत्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. पाऊस लागून राहिला तर या लोकांना वाचवणे कठीण आहे. जे लोक जिवंत आहेत त्यांना अगोदर सुरक्षित बाहेर काढणे यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असले तरी मृतदेह सडू लागल्याने रोगराईचा धोकाही वाढत चालला आहे.


पेठाणीत ढगफुटी
पेठाणी भागात सोमवारी ढगफुटीमुळे अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. अनेक घरे तसेच दुकाने वाहून गेली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. दीडशेहून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. 28 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला असल्याने दुर्गम भागात अडकलेल्या लोकांना मदत मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे.

धीर धरा, आमचे हेलिकॉप्टर येतील : हवाईदलप्रमुख
प्रत्येक माणसाला संकटातून बाहेर काढल्याखेरीज आमच्या हेलिकॉप्टर्सचे पंखे बंद होणार नाहीत. आशा सोडू नका, धीर धरा आमचे हेलिकॉप्टर येतीलच, अशा शब्दांत हवाई दलप्रमुख एनएके ब्राऊने यांनी सोमवारी आपद्ग्रस्तांना उद्देशून संदेश दिला. नैसर्गिक संकट तर रोखू शकत नाहीत, पण आपत्तीनंतर चांगली कामगिरी करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीतही आमचे जवान उत्तम कार्य करत आहेत, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.


दोन-तीन दिवसांत मदतकार्य पूर्ण होईल : बहुगुणा
वाईट काळ सरला आहे. बचाव पथकांनी चांगली कामगिरी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मदतकार्य पूर्ण होईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी म्हटले आहे. काही राज्यांनी हेलिकॉप्टर पुरवण्याची तयारी दाखवली होती, त्यावर आम्हाला त्याची गरज नसून, आमच्याकडे पुरेसे हेलिकॉप्टर आहेत, असे बहुगुणा यांनी म्हटले आहे.


मदतीच्या 24 ट्रकना राहुलकडून हिरवी झंडी
वाताहतीच्या आठवडाभरानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी समोर आले. मदतसाहित्याच्या 24 ट्रकना त्यांनी हिरवी झंडी दाखवली. राहुल उत्तराखंडलाही जाणार आहेत. डेहराडून येथील नियंत्रण कक्षाची ते पाहणी करतील.


पावसाने उघडीप दिली तरच बचाव कार्य शक्य
सोमवारी सकाळी पावसामुळे बचाव पथकाचे हेलिकॉप्टर उडू शकले नाहीत. उघाड पडल्यावर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनी 115 फे-या करून 1095 लोकांना वाचवले. दरम्यान, रुद्रप्रयाग आणि गुप्तकाशीदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. यामुळे बचावकार्य खोळंबले आहे. लष्कर तसेच आयटीबीपीने गिर्यारोहकांची मदत घेतली. जवानांनी 1375 आणि आयटीबीपीच्या पथकाने 717 लोकांना वाचवले. एनडीआरएफच्या पथकांनी 120 लोकांना सुरक्षित बाहेर काढले.


देवाचा मुकुट, पंचमुखी मूर्ती बेपत्ता
महाप्रलयानंतर केदारनाथ मंदिरातील देवाचा सोन्याचा मुकुट, पंचमुखी मूर्ती अजून दिसलेली नाही. एक तर या वस्तू ढिगा-याखाली असतील किंवा कुणीतरी चोरून नेल्या असण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका साधूच्या झडतीमध्ये 83 लाख रुपये रोख सापडले. एसबीआयचे एक एटीएम फुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यातील पैसे गायब आहेत.
मंदिरात 9 तास घंटेला लटकला : केदारनाथ मंदिरात राहणा-या विजेंदरसिंगने महापुरात घंटेला लटकून जीव वाचवला. सकाळी 7 वाजता पाणी गळ्यापर्यंत आले. धीर न सोडता 4 वाजेपर्यंत तो लटकलेल्या अवस्थेतच होता. पाणी ओसरल्यावरच तो खाली उतरला.


‘गुगल’ची क्रायसिस रिस्पॉन्स मॅप सेवा
आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी गुगलने क्रायसिस रिस्पॉन्स मॅप सेवा सुरू केली आहे. यात उत्तराखंडच्या नकाशावर पूरग्रस्त ठिकाणे, मदत व निवारा केंद्रे, वैद्यकीय केंदे्र, फोन क्रमांक, बंद मार्ग आदी दर्शवण्यात आले आहे. पूरग्रस्त जागी क्लिक करताच अडकलेले भाविक, हवामान, संबंधित अधिकारी, सुटका झालेल्यांची यादी मिळते.