आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Disaster In Uttarakhand: Still 13 Thousand People Stranded

उत्तराखंडमधील महाप्रलय: तेरा हजार यात्रेकरू अजूनही बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/ नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर झालेल्या महाप्रलयानंतर लष्कराच्या मदतीने 39 हजार यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही 13 हजार लोक बेपत्ता आहेत. पाणी ओसरल्यानंतर बचाव पथकांना जागोजाग मृतदेह आढळून येत असल्यामुळे
मृतांचा आकडा वाढत चालला आहे. शुक्रवारी हरिद्वारमध्ये 50 हून अधिक मृतदेह नदीकिनारी सापडले.

उपनद्यांमध्येही मृतदेह दिसत आहेत. बचावकार्य सुरू असताना मुसळधार पाऊस, महापुराने झालेल्या विध्वंसाचे हे विदारक चित्र समोर येत आहे. ढिगा-यांतून मार्ग काढत दुर्गम भागांत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे मोठे आव्हान ठरत आहे.


लष्कर तसेच हवाई दलाचे 45 हेलिकॉप्टर रात्रंदिवस मदतकार्यात आहेत. लष्कराच्या सूत्रांनुसार उत्तराखंडमध्ये 45 हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रात महापुराने वाताहत झाली आहे. रस्ते उद्ध्वस्त झाले असून वाहतुकीत प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागांत हेलिकॉप्टरवरच मदतकार्याची भिस्त आहे. यापेक्षा अधिक हेलिकॉप्टर वापरावयाचे ठरवले तरी त्यांच्या उड्डाणांच्या दृष्टीने संख्या वाढवणे धोकादायक ठरू शकते.


मदतीसाठी प्रयत्नांची शर्थ सुरू असताना उत्तराखंडमधील हवामानही वेगाने बदलत आहे. दोन-तीन दिवस उघडलेला पाऊस थोडा दिलासा देणारा असला तरी येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 24-25 जूनला हा पाऊस पुन्हा सुरू झाला तर बचावकार्यात मोठे अडथळे येतील आणि जीवितहानी आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.


वेदना असह्य
काळजाचा तुकडा दगडांखाली दबला
अलिगडच्या हरिओम वर्मांचे पूर्ण कुटुंब डोळ्यादेखत संपले. पत्नी, 8वर्षांची मुलगी, 4 वर्षांचा मुलगा ढिगा-याखाली दबला. मोठा मुलगा अमन जिवंत होता. श्वास कोंडत होता. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तीन तास तो मांडीवर होता. शेवटी त्याने प्राण सोडला.


भुकेने तडफडत भावाने अखेर प्राण सोडला
हौजखास (दिल्ली) येथील विजय नारायण पांडे कुटुंबातील आठ जण यात्रेला गेले होते. बहीण पुष्पा तेवढी जिवंत आहे. कुटुंबातील सहा सदस्य वाहून गेले. दोघे वाचले. भाऊ आणि बहीण. पण त्यानंतर चौथ्या दिवशी भावानेही भुकेने व्याकूळ होऊन डोळ्यादेखत प्राण सोडला.


शंकराच्या कैलासावर हतबलता
भुकेमुळे मुले बेशुद्ध, तहानेने गेले जीव
पालखेडी (इंदूर)च्या सौदानसिंहने सांगितले की, माझ्या तीन बहिणी तहानेने कासावीस झाल्या. दोघींनी मंगळवारी तर तिसरीने बुधवारी प्राण सोडला. काही वेळापूर्वी सहकारी भगवानसिंह शांत झाले. आता आमची वेळ आहे. डोंगरांवर लुटालूट सुरू झालीय. मृतदेहावरचे दागिनेही ओरबाडून घेतले जाताहेत.
फरिदाबादच्या सेक्टर 7 मधील पुष्पक गुप्ता पत्नी व दोन मुलींसह केदारनाथला गेले होते. ते अजूनही तेथे अडकले आहेत. कसेबसे ते अजून जिवंत आहेत.


सुखरूप परतले तरी मन मागेच राहिली
आनंद : ते परतले, जीव भांड्यात पडला
जालना येथून 40 भाविक उत्तराखंडमध्ये गेले होते. रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे महापूर आला आणि होत्याचे नव्हते झाले. कोण नेमक्या कोणत्या भागात आहे, कोणत्या परिस्थितीत आहे याची कुणालाच माहिती नव्हती. चार दिवस प्रत्येकाच्या कुटुंबीयांनी अक्षरश: रात्र जागून काढली. शुक्रवारी दुपारी यातील चौधरी कुटुंबातील 8 यात्रेकरू परतले आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 25 यात्रेकरूंशी संपर्क होऊ शकला आहे. हा दिलासा प्रत्येकाला निश्चितच आनंद देणारा ठरला.


दु:ख : औषधे आणण्यासाठी गेले, परतलेच नाहीत
परभणी येथील माधवराव देशपांडे यांचे कुटुंबीय चारधामसाठी गेले होते. महाप्रलय झाला त्या दिवशी हे लोक गौरीकुंडात एका हॉटेलमध्ये उतरले होते. रात्री सर्व काही सुरळीत असताना कुटुंब हॉटेलबाहेर पडले. पण, मधुमेहाने आजारी असलेल्या वडिलांची औषधे आणण्यासाठी रेणुकादास देशपांडे पुन्हा हॉटेलमध्ये गेले आणि नेमक्या त्याच वेळी हॉटेल कोसळले. अजूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.


चिंता : त्या सर्वांचा संपर्कच तुटलेला
औरंगाबादेतील झंवर आणि लाहोटी कुटुंबीय चारधाम यात्रेसाठी गेले आहेत. दोन्ही कुटुंबातील 12 सदस्यांपैकी केवळ राजेश झंवर यांच्याशीच कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला. उर्वरित लोक कुठे आहेत, याची माहिती कुणाकडेच नाही. शहरातून 48 जण 8 जूनला यात्रेवर गेले आहेत. यातील कित्येक जणांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.