आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report: 60 Percent Voting In Fundamentalist Base In Kashmir

ग्राऊंड रिपोर्ट: फुटीरतावाद्यांच्या 'घरा'त ६० टक्के उत्स्फूर्त मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र - काश्मीर खोऱ्यात मतदानासाठी लांब रांग लागल्याचे चित्र अनेक वर्षांनंतर पाहावयास मिळाले. खो-याचे चित्र पालटावे यासाठी लोकांनी धाडस दाखवले.
श्रीनगर - बडगाम जिल्ह्यातील सोईबाग हे युनायटेड जिहाद काैन्सिल व हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाउद्दीन याचे गाव. निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेहमीचे होते. मतदारांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक निर्भयपणे बाहेर पडले. प्रथमच विक्रमी ६० टक्के मतदान झाले. सलाउद्दीनच्या घराशेजारी मतदान केंद्र असताना एवढे मतदान झाले हे विशेष. मतदारांची रांग पाहता ही स्थिती पाहण्यासारखी झाली होती.

आम्ही दर वेळी सलाउद्दीनचे ऐकले. मात्र, त्यामुळे ना गावचे भले झाले ना आमचे. लोकशाहीपासून दूर राहून किती दिवस जगायचे, असा सवाल मतदारांनी केला. सुंदर खो-यात वसलेल्या या गावाचा विकास झाला नाही. सर्वांचा अनुभव घेतला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करणारे अनेक जण आहेत. रुबिना आणि नजिरा बेगम त्यापैकीच आहेत. त्या म्हणाल्या, आमच्या मुलांना अशा दैन्यावस्थेत राहण्याची इच्छा नाही. आम्ही कोणाची पर्वा केली नाही. सकाळी उठून पहिल्यांदा मतदान केले. संपूर्ण काश्मीरचे असेच चित्र आहे.
जोरीगुंड गावात ९५ टक्के मतदान झाले आहे.
दोनशेपेक्षा जास्त घरांत ६९७ पेक्षा जास्त मतदार आहेत. मतदान केले नाही असे एकही घर नव्हते. आमच्या भागात चांगले रस्ते, रुग्णालय व्हावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, अशी सर्वांची इच्छा आहे, असे एका तरुणाने सांगितले. दीड हजार मतदारांच्या गोंदीपोरा गावची फिजा महाविद्यालयीन तरुणी आहे. खो-यातील मुलींना उच्च शिक्षण मिळावे. त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा हाच एक उपाय आहे. आम्ही आमचा हक्क बजावला. इथे ८२ टक्के मतदान झाल्याचे फिजाने सांगितले.

तरुणांचा उत्साह पाहण्याजोगा होता. तरुणांनी निवडणुकीचे चित्रच पालटवले. चंडुरा भागातील मुजफ्फर खान, मोहंमद अश्रफ, फिजाज अहमद आणि अर्शद बट यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पहिल्यांदाच मतदान केले. मतदान न करून आपल्याच पायावर कु-हाड मारत असल्याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. रोजगार हाच मुख्य प्रश्न आहे.

लोकांना भाजपबद्दल साशंकता असल्यामुळे या वेळी मतदान जास्त झाले, असाही तर्क आहे. काही पक्षांनी तसा प्रचारही केला होता. कदाचित त्यात त्यांना यश आले असावे. असे असले तरी लोक मात्र याबाबत वेगवेगळे विश्लेषण करत आहेत.

लोकसभेवेळी शून्य, यंदा पडली आठ मते!
सोपोर । हा भाग अतिरेक्यांचा अड्डा मानला जातो. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दर वेळी केले जाते. धमक्यांचे पोस्टर्सही लागले होते. याच भागात बोमई नावाचे गाव आहे. लोकसभा निवडणुकीत इथे एकही मतदान झाले नव्हते. लोकांनी सरकारी अधिका-यांना मतदान केंद्रामध्ये कोंडले होते. या वेळी मात्र ८ मते पडली. मतदान कसे झाले कुणालाच कळले नाही. दहशतवादाची पकड सैल झाल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.